Fri, Sep 25, 2020 15:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धडाकेबाज विजयासह भारताने मालिका जिंकली

धडाकेबाज विजयासह भारताने मालिका जिंकली

Last Updated: Dec 12 2019 10:13AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

भारताच्या अवाढव्य २४० धावांची पाठलाग करताना खराब सुरुवातीनंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड (६८) आणि शिमरोन हेटमाय र(४१) यांनी झुंजार खेळी केली. पण, भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेत विंडीजचे सगळे मनसुबे उधळून लावलत विंडीजला ८ बाद १७३ धावात रोखत ६७ धावांनी विजय मिळवला.  या विजयाबरोबरच भारताने २-१ अशी मालिका खिशात घातली. भारताचा वेस्ट इंडिजवरील हा सलग 7 वा मालिका विजय आहे. मालिकेत पहिल्यांदाच संधी मिळालेल्या कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांनी चांगला मारा केला. कुलदीप, भुवनेश्वर आणि दीपक चाहरने प्रत्येकी २ तर मोहम्मद शमीने १ विकेट घेतली. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने लोकेश राहुलच्या ९१ विराटच्या नाबाद ७०  आणि रोहित शर्माच्या ७१ धावांच्या जोरावर ३ बाद २४० धावा केल्या होत्या.   

भारताच्या २४१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्यापासून आक्रमक खेळण्याचा दबावात विंडीजचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतले. संघाच्या १२ धावा झाल्या असताना भुवनेश्वरने ब्रँडन किंगला (५) बाद केले. त्यानंतर महोम्मद शमीने लेंडल सिमन्सला ७ धावांवर बाद कर विंडीजला दुसरा धक्का दिला. भारताच्या दोन्ही अनुभवी जलदगती गोलंदाजांनी विकेट मिळवल्यानंतर युवा जलदगती गोलंदाज दीपक चहरनेही पूरनला बाद करत विंडीजला १७ धावांवरच तिसरा धक्का दिला. 

विंडीजचे तीन फलंदाज अवघ्या १७ धावात माघारी गेल्यानंतर कर्णधार केरन पोलार्ड आणि हेटमायरने विंडीजचा डाव सावरला. या दोघांनी पॉवर प्लेचा फायदा उचलत फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७४ धावांची भागिदारी रचली. या दोघांनी जवळपास ९.५ ते १० च्या सरासरीने धावा करण्यास सुरुवात केल्याने भारतावर दबाव वाढला होता. पण, कुलदीप यादवने २४ चेंडूत ५ षटकारांच्या मदतीने ४१ धावा करणाऱ्या शिमरोन हेटमायरला बाद करत भारताला दिलासा दिला. हेटमायर बाद झाला त्यावेळी विंडीजच्या ९.३ षटकात ९१ धावा झाल्या होत्या. हेटमायरची हिटिंग शांत झाल्यानंतर विंडीजची धावगतीही कमी आली. त्यातच कुलदीपने जेसन होल्डरला ८ धावांवर  बाद करत विंडीजला पाचवा धक्का दिला. 

त्यानंतर कर्णधार कायरन पोलार्डने एकाकी झुंज देण्यास सुरुवात केली. त्याने अर्धशतक झळकावत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला पण, अखेरीस पोलार्डची ही ६८ धावांची झुंजार खेळी भुवनेश्वर कुमारने संपवली.  पोलार्ड बाद झाला त्यावेळी विंडीजच्या १५ षटकात ६ बाद १४१ धावा झाल्या होत्या. विंडीजला आता जिंकण्यासाठी ३० चेंडूत १०० धावांची गरज होती. पण, त्यांच्याकडे आक्रमक फलंदाज शिल्लक नव्हता. अखेर विंडीजचा डाव २० षटकात ८ बाद १७३ धावात संपुष्टात आला. 

तत्पूर्वी, भारताचे सलामीवीर रोहित-राहुलने दिलेल्या १३५ धावांच्या दमदार सलामीवर विराट कोहलीने कळस चढवला. त्यामुळे भारताने तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात २० षटकात ३ बाद २४० धावांचा डोंगर रचला. भारताकडून लोकेश राहुलेने सर्वाधिक ५६ चेंडूत ९१ धावा तर रोहितने ३४ चेंडूत ७१, विराटने २९ चेंडूत नाबाद ७० धावा कुटल्या. मुंबईच्या फलंदाजीला पोषक असलेल्या या खेळपट्टीवर भारताने जरी मोठी धावसंख्या उभारली असली तरी गोलंदाजांचा कस लागणार आहे. 

भारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्माची बॅट वेस्ट इंडिज बरोबरच्या पहिल्या दोन सामन्यात शांतच होती. पण, आज मुंबईतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ही बॅट तळपली. त्याने चौकार आणि षटकारांची आतशबाजी करत ३३ चेंडूत ७१  धावांची झंजावाती खेळी केली. त्याला लोकेश राहुलनेही तितक्याच आक्रमक स्टाईलने सांथ दिली. या दोघांनी ११.४ षटकात १३५ धावांची सलामी दिली. 

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी करण्यास पाचारण केल्यानंतर भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने फटकेबाजी करत सुरुवात केली. आपल्या होमग्राऊंडवर खेळणाऱ्या रोहितने चौकार मारतच भारताचे खाते उघडले. त्यानंतर लोकेश राहुनेही पॉवर प्लेचा फायदा घेण्यास सुरुवात केली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे भारताने पहिल्या ४ षटकातच आपले अर्धशतक धावफलकावर लावले. रोहित शर्माने आपल्या गेल्या दोन सामन्यातील अपयश चांगलेच धुवून काढले. त्याने २३ चेंडूत अर्धशतक ठोकले. पाठोपाठ राहुलनेही अर्धशतक ठोकून भारताला १० षटकात  धावांपर्यंत पोहचवले.

भारताच्या सलामी जोडीने पहिल्या १० षटकात विंडीजची चांगलीच धुलाई केल्यानंतर अखेर १२ व्या षटकात विंडीजला पहिले यश मिळाले. केसरिक विल्यम्सने रोहितला वॉल्शकरवी बाद केले. रोहितने ६ चौकार आणि ५ षटकार ठोकत ३३ चेंडूत ७१ धावांची आतशी खेळी केली. रोहित बाद झाल्यानंतर आलेल्या ऋषभ पंतला मात्र भोपळाही फोडता आला नाही. त्याला विराटने आपल्या आधी फलंदाजीला पाठवले होते. शिवम दुबेलाही गेल्या सामन्यात बढती दिली होती. त्याने त्याचे सोने करत अर्धशतक ठोकले पण, पंतला या संधीचा फायदा उचलता आला नाही.  

पंत बाद झाल्यानंतर आलेल्या विराट आणि केएल राहुलने फटकेबाजी सुरु करत १४ व्या षटकात भारताच्या १५० धावा धावफलकावर लावल्या. पण, त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या विल्यम्सने प्रभावी मारा करत विराट आणि राहुलला शांत ठेवण्यात यश मिळवले. त्यामुळे भारताच्या धावगतीला ब्रेक लागला. पण, विल्यम्स विराट आणि राहुलला फारकाळ शांत ठेऊ शकला नाही या दोघांनी सामन्याचे १८ व्या आणि विल्यम्सच्या अखेरच्या षटकात २ षटकार मारत १७ धावा ठोकल्या आणि भारताला २०० च्या पार नेले. 

त्यानंतर अखेरच्या २ षटकात विराटने फटकेबाजी करत २१ चेंडूत आपले अर्धशत पूर्ण केले. दरम्यान राहुलही टी-२० शकताच्या जवळ पोहचला होता. अखेरच्या षटकातल्या ३ चेंडू राहिले असताना राहुलला शतकासाठी ९ धावा गरजेच्या होत्या पण, बाऊन्सर फटकावण्याच्या नादात तो बाद झाला त्याने ५६ चेंडूत ९१ धावा केल्या. त्यानंतर विराटने अखेरच्या चेंडूवर षटकार मारत भारताला २४० धावांपर्यंत पोहचवले. विराटने २९ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकार मारत नाबाद ७० धावा केल्या.  

 "