होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अयोध्येच्या निकालानंतर राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी वाढली : पीएम मोदी

अयोध्येच्या निकालानंतर राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी वाढली : पीएम मोदी

Last Updated: Nov 09 2019 6:57PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. अयोध्या निकालानंतर भारताची लोकशाही मजबूत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले असून सर्वोच्च न्यायालयाकडून ऐतिहासिक निकाल देण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी वाढली.... 

पीएम मोदी म्हणाले की, राम मंदिर बांधण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयानंतर आता देशाच्या प्रत्येक नागरिकावर राष्ट्र निर्मितीची जबाबदारी वाढली आहे. प्रत्येक पक्षाला युक्तिवाद मांडण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अनेक कारणांमुळे महत्त्वपूर्ण आहे. या निकालानंतर हे लक्षात आले आहे की, कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे. 

९ नोव्हेंबरचे ऐतिहासिक महत्त्व

९ नोव्हेंबर १९८९ रोजी बर्लिनची भिंत पडली. या घटनेला ३० वर्षे झाली. बर्लिन भिंत पाडून दोन विरोधी प्रवाह एकत्र झाले. त्यामुळे कटूता विसरून तेथील नागरिकांनी एका नव्या युगास प्रारंभ केला. त्याच प्रमाणे आज भारतीय न्याय व्यवस्थेने ऐतिहासिक निर्णय देत भारताला एक नवी दिशा दिली आहे. आजच करतारपूर साहिब कॉरिडोरलाही उत्साहात प्रारंभ झाला. या कॉरिडोरच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान यांच्यातील नव्या मैत्रीपर्वास सुरुवात झाल्याचे म्हणता येईल. त्यामुळे एक प्रकारे ‘९ नोव्हेंबर’ही तारीख आपल्या सर्वांना एकत्रितपणे पुढे जाण्यास शिकवित असल्याचे मत पीएम मोदींनी मांडले.

न्यायालयाच्या निर्णयाने नवी पहाट

देशवासियांना शांती, सद्भावना, सलोखा राखण्याचे आवाहन करत पीएम मोदी यांनी महत्त्वपूर्ण संदेश दिला. ते म्हणाले की, सर्व भारतीयांना बरोबर घेऊन जाणे, सर्वांचा विकास करणे, सर्वांचा विश्वास मिळवणे आणि पुढे जाणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने एक नवीन पहाट उजाडली आहे. या वादाचा ब-याच पिढ्यांवर परिणाम झाला, पण निर्णयानंतर नवीन पिढी सुरवातीपासूनच न्यू इंडियाच्या निर्मितीत सामील होईल असा संकल्प आपण केला पाहिजे. चला एक नवीन सुरुवात करूया, एक नवीन भारत बनवू, असा संदेश आपल्य भाषणातून पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.

न्यायव्यवस्था कौतुकास पात्र

भारतीय राज्यघटना, न्यायव्यवस्था किंवा आपली मोठी परंपरा यावर आमचा विश्वास दृढ राहिला पाहिजे, हे फार महत्वाचे आहे. आजच्या दिवसाचा संदेश हा ‘जोडण्याचा’ व एकत्रित ‘राहण्याचा’ आहे. देशाला एकसंध ठेवण्याचा निर्णय देणारी देशाची न्यायव्यवस्था, न्यायलयाचे न्यायाधीश कौतुकास पात्र आहेत, असेही मत मोदींनी व्यक्त केले.

भविष्यातील भारतासाठी काम करत रहा...

सर्वोच्च न्यायालयाने सर्वांचे म्हणणे ऐकले. सर्वांच्या संमतीने या विषयावर आदर्शवत असा निर्णय दिला गेला. या निर्णयानंतर संपूर्ण देशाला आनंद झाला. निर्णय सांगण्यात सर्वोच्च न्यायालयाने दृढ इच्छाशक्ती दाखविली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. आपल्यातील सुसंवाद, आपले ऐक्य, शांतता आणि आपुलकी देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण भविष्याकडे पहावे लागेल. भविष्यातील भारतासाठी काम करत रहा. भारतापुढे आणखी आव्हाने आहेत. इतरही ध्येये आहेत, ती आपल्याला गाठायची आहेत. प्रत्येक भारतीय एकत्र काम करून ही उद्दिष्टे साध्य करेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला.