Sat, May 30, 2020 13:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आधी कोरोना टेस्टिंग किटला जन्म मग बाळाला; देशातील पहिल्या किटवर मराठी रणरागिनीची मोहोर!

आधी कोरोना टेस्टिंग किटला जन्म मग बाळाला; देशातील पहिल्या किटवर मराठी रणरागिनीची मोहोर!

Last Updated: Mar 28 2020 3:59PM
पुणे : पुढारी  ऑनलाईन 

देशात थैमान घातलेल्या कोरोनाचे टेस्टिंग  किट बाजारात आले आहे. या किटवर मराठी रणरागिनी मोहोर उमटली आहे. प्रसुतीला काही दिवसांचा कालावधी असतानाही या किट संशोधनात डॉ. मिनल दाखवे-भोसले यांनी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे देशातील पहिल्या टेस्टिंग किटवर मराठी मोहोर उमटली आहे. त्यांच्या प्रयत्नांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करून कौतुक केले. 

डॉ. मिनल भोसले पेशाने विषाणू तज्ज्ञ असून मायलॅब या फार्मा कंपनीमध्ये संशोधन आणि विकास विभागाच्या त्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमने भारतातील पहिल्या ‘कोरोना टेस्ट किट’चा शोध लावला आहे.

कोरोना किटमुळे आता दोन ते अडीच तासांमध्ये संबंधित नमुना कोरोना पॉझिटीव्ह आहे की नाही याची माहिती घेणे शक्य होणार आहे. सध्या याच प्रक्रियेसाठी सहा ते सात तास लागत आहेत. देशातील पहिल्याच असलेल्या या किटला ‘पॅथो किट’ नाव देण्यात आले असून त्याची सहा आठवड्यात निर्मिती झाल्याचे डॉ. मिनल यांनी सांगितले. 

मिनल भोसले यांनी गर्भवती असूनही आपल्या टीमसह कोरोना टेस्टिंग किटसाठी प्रयत्नशील होत्या. त्यांनी आपला अनुभव कथन करताना सांगितले की, हा आणीबाणीचा काळ असल्याने आव्हान म्हणूनच हे काम करण्याचे ठरवले. मला देशासाठी योगदान द्यायचे होते. माझ्या १० सहकाऱ्यांच्या टीमने हे काम यशस्वीपण केले.

त्यांनी प्रसुतीच्या एक दिवस आधी त्यांनी कोरोना किटचं काम पूर्ण करुन ते  मान्यतेसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवलं. यानंतर राष्ट्रीय विषाणू संस्थेने देखील ही किट १०० टक्के निकष पूर्ण करत असल्याचं सांगत मान्यता दिली.