Tue, Aug 04, 2020 14:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'शिवसेना मायनस केली असती तर भाजपला ४०-५० जागा मिळाल्या असत्या'

'शिवसेना मायनस केली असती तर भाजपला ४०-५० जागा मिळाल्या असत्या'

Last Updated: Jul 11 2020 10:39AM

शरद पवारमुंबई : पुढारी ऑनलाईन

विधानसभेला भाजपला ज्या १०५ जागा मिळाल्या त्यात शिवसेनेचं योगदान फार मोठे होते. त्यातून तुम्ही शिवसेना मायनस केली असती, त्यांच्यात सामील नसती तर १०५ चा आकडा तुम्हाला कुठेतरी ४०-५० च्या आसपास दिसला असता, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पवार यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

वाचा : 'तुम्ही सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', यावर शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर

भाजपचे लोक जे सांगतात की, आम्ही १०५ असतानाही आम्हाला शिवसेनेने दुर्लक्षित केलं किंवा सत्तेपासून दूर ठेवलं. भाजपला १०५ पर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनाच जर गृहित धरण्याची भूमिका घेतली तर मला वाटत नाही की इतरांनी काही वेगळं करण्याची आवश्यकता आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन... हा मुद्दा विधानसभा निवडणुकीदरम्यान गाजला होता. यावर शरद पवार यांनी खोचक टोला लगावला आहे. कुठल्याही राजकर्त्यांना, राजकीय नेत्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहित धरायचं नसतं. अशा गृहित धरण्यात थोडासा दर्प आहे अशा प्रकारची भावना लोकांच्यात झाली आणि यांना धडा शिकवला पाहिजे हा विचार लोकांच्यात पसरला, असे पवार यांनी म्हटले आहे.   

वाचा : शरद पवारांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या कार्यपद्धतीचे केले कौतुक, म्हणाले...

मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक...

या मुलाखतीदरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीचे देखील कौतुक केले. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कठोरपणानं लॉकडाऊन करण्याची आवश्यकता होती. त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली. एवढी कठोर भूमिका घेतली नसती तर कदाचित न्यूयॉर्कसारखी अवस्था इथे झाली असती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा थोडा उशिरा घेतला असे काहींजणांना वाटले असेल, पण त्यांनी तो निर्णय योग्य वेळी घेतला, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

वाचा : मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना जनतेनेच धडा शिकवला

मुख्यमंत्र्यांच्या जो स्वभाव आहे त्याच स्वभावाला साजेसाच हा निर्णय आहे. ते अत्यंत सावधगिरीने निर्णय घेतात. त्याचे दुष्पपरिणाम होणार नाहीत याची खातरजमा जेवढी करुन घेता येईल तेवढी करुन घेतात. त्यानंतर पाऊल टाकतात. एकदा पाऊल टाकल्यावर मागे घ्यायचं नाही ही त्यांची कार्यपद्धती आहे, असे पवार यांनी पुढे सांगितले.