Mon, Jun 01, 2020 03:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर; सहा महिन्यात ४ लाख ८८ हजार कोटींचे कर्ज घेण्याच्या तयारीत!

केंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर; सहा महिन्यात ४ लाख ८८ हजार कोटींचे कर्ज घेण्याच्या तयारीत!

Last Updated: Apr 01 2020 2:52PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना संसर्ग नागरिकांसह देशाच्या अर्थव्यवस्थेलाही कमकुवत करीत आहे. संसर्गामुळे अर्थव्यवस्थेला चांगलेच हादरे बसत आहेत. केंद्र सरकार त्यामुळे पुढील सहा महिन्यात ४ लाख ८८ हजार कोटींचे कर्ज घेण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती आर्थिक प्रकरणाचे सचिव अतनु चक्रवर्ती यांनी दिली. 

२०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्र सरकारला यंदा बाजारातून ७.८ लाख कोटी रूपयांचे कर्जाची आवश्यकता पडेल, अशी शक्यता अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी व्यक्त केली होती. कर्जातील एकूण ६० टक्के रक्कम सुरुवातीच्या ६ महिन्यात घेण्यात येईल, अशी स्पष्टोक्तीही सीतारामण यांनी केली होती. नवीन आर्थिक वर्षात बाजारातून घेण्यात येणार्या रक्कमेचा एक भाग भांडवली खर्चावर खर्च होण्याचा अनुमानही अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली होती. सरकारने यंदा भांडवली खर्चात २१ टक्क्यांच्या वाढीची तरतूद ही केली आहे. 

वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारकडून बाजारातून कर्ज घेण्यात येते. मर्यादीत बॉन्ड तसेच ट्रेजरी बील त्यासाठी काढण्यात येते. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात सरकारची वित्तीय तुट ७.९६ लाख कोटी रूपये राहण्याची शक्यता सीतारामण यांच्याकडून वर्तवण्यात आली होती. ही तुट विकासदराच्या ३.५ टक्के आहे. केंद्र सरकार कडून घेण्यात येणाऱ्या या कर्जाचे ओझे सर्वसामान्यांवर पडण्याची शक्यता वर्तवली  जात आहे. 

अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान!

कोरोनामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानूसार लॉकडाउन मुळे अर्थव्यवस्थेचे जवळपास १२० अब्ज डॉलर म्हणजेच नऊ लाख कोटी रूपयांचे नुकसान होवू शकते. हे नुकसान देशाच्या जीडीपीच्या चार टक्क्यांबरोबर आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे उत्पादन, विक्री, मागणी सर्वकाही ठप्प पडले आहे.