Thu, Jan 30, 2020 01:30



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत, तरी किती?

राज्यात नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत, तरी किती?

Last Updated: Dec 11 2019 6:28PM




मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 260 राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी 16 मान्यता प्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष; तसेच अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता 48 ऐवजी 190 मुक्त चिन्हे निश्चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

मदान यांनी सांगितले की, राज्यातील ग्रामपंचायती वगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. भारत निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते. 

राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण 16 पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आतापर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 244 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या 18 जानेवारी 2017 च्या अधिसूचनेनुसार 48 मुक्त चिन्हे निश्चित करण्यात आली होती. त्यात आता 30 नोव्हेंबर 2019 रोजीच्या अधिसूचनेनुसार 142 नव्या चिन्हांची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे ही संख्या आता 190 झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कणीस आणि विळा), भारतीय जनता पार्टी (कमळ), नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (घड्याळ).