Sat, Jul 04, 2020 15:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात एका दिवसात उच्चांकी ६ हजार ८८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

देशात एका दिवसात उच्चांकी ६ हजार ८८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Last Updated: May 22 2020 5:58PM

file photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

देशातील ज्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे, त्या राज्यांसह जिल्ह्यांवर केंद्र सरकार विशेष लक्ष देत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून दिली. राज्य सरकारच्या समन्वयाने नियंत्रण क्षेत्र तसेच रूग्णालय व्यवस्थापन, रूग्णांना योग्य उपचार देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. सर्वांनी मिळून आवश्यक उपाययोजना करीत कोरोनासंसर्गापासून स्वत: तसेच कुटुंबियांना वाचवण्याची आवश्यकता असल्याचे मत अग्रवाल यांनी व्यक्त केले. 

देशात आतापर्यंत ४८ हजार ५३४ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासांत ३ हजार ३३४ कोरोनामुक्त नागरिकांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. देशाचा कोरोनामुक्तीचा दर त्यामुळे ४१ टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. मृत्यूदरातही कमालीची सुधारणा नोंदवण्यात आल्याचेही ते म्हणाले.
 
देशात कोरोनाचा मृत्यूदर १९ मे ला ३.१३ टक्के होता. हा मृत्यूदर आता ३.०२ टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनूसार देशातील रूग्णसंख्या १ लाख १८ हजार ४४७ झाली असून आतापर्यंत ३ हजार ५३८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. गेल्या एका दिवसात उच्चांकी ६ हजार ८८ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, १४८ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत देशातील २७ लाख ५५ हजार ७१४ जणांची ​वैद्यकीय तपासणी करण्यात आली. लागोपाठ चौथ्या दिवशी देखील १ लाखांहून अधिक वैद्यकीय तपासण्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर ) करण्यात आल्या. यातील ८५ हजार ५४२ वैद्यकीय तपासण्या सरकारी प्रयोगशाळांमध्ये (४०१), तर १८ हजार २८७  तपासण्या या १७८  खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. 
महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, तामिळनाडू तसेच राजस्थानमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, अशात या राज्यांतील कोरोनाबाधितांचा वाढता आलेख खाली आणण्यासाठी केंद्राकडून काय उपाययोजना केल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारी (२२ मे संध्याकाळी ५ पर्यंत) 
एकूण रूग्णसंख्या- १ लाख १८ हजार ४४७
सक्रिय रूग्ण - ६६ हजार ३३०
कोरोनामुक्त-  ४८ हजार ५३३
मृत्यू - ३ हजार ५८३