Sat, Oct 31, 2020 15:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ३२ साखर कारखान्यांना ३९१ कोटींची थकहमी

३२ साखर कारखान्यांना ३९१ कोटींची थकहमी

Last Updated: Sep 23 2020 1:29AM

संग्रहीत छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

गाळप हंगाम तोंडावर आला असताना आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाला 391 कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांबरोबरच विरोधी पक्षाच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे.

राज्यातील ऊस गाळप हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. मात्र अनेक कारखाने आर्थिक संकटात असल्याने ते यावेळी गाळप हंगाम घेऊ शकतील की नाही याबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली होती. अशा 32 कारखान्यांना ही थकहमी देण्यात आली आहे. ही थकहमी दिल्याने हे कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा भाऊराव चव्हाण, माजी मंत्री प्रकाश सोळंखे यांचा सुंदरराव सोळंखे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विठ्ठलराव विखे, प्रवरानगर, हर्षवर्धन पाटील यांचा निरा भीमा, विजयसिंह मोहिते पाटील यांचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, रावसाहेब दानवे यांचा रामेश्वर, मदन भोसले यांचा किसन वीर, धनंजय महाडिक यांचा मोहोळ येथील भीमा टाकळी, कल्याणराव काळे यांचा पंढरपूर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा कुंभी-कासारी आदी कारखान्यांचा समावेश आहे.

थकहमीपोटी प्रतिक्विंटल 250 रुपयांची वसुली

या कारखान्यांच्या क्षेत्रात 170 लाख मेट्रिक टन ऊस आहे. त्याची एफआरपी सुमारे 4 हजार 800 कोटी आहे. यापूर्वी राज्य सरकारने दिलेली थकहमी बुडीत निघाल्याने हे कर्ज वसूल होईल याची काळजी घेतली आहे. या कारखान्यांकडून थकहमी वसूल करण्यासाठी प्रति क्विंटल साखरेवर 250 रुपये वसूल करण्यात येणार आहेत.
 

 "