Tue, Jun 15, 2021 13:24
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नाव सांगून सोनाराला ५ लाखांचा गंडा घालणारे फरार बाप - लेक गजाआड

Last Updated: Jun 11 2021 4:11PM

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

बाप - लेक जोडीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माझे बंधू आहेत अशी थाप मारली. त्यांनी आडनावातील साधर्म्याचा फायदा घेतला. तसेच आपली आयकर विभागात ओळख असून तुम्हाला आयकर विभागाने पकडलेले सोने कमी किंमतीत मिळवून देतो. असे आमिष दाखवून एका सोनाराला ५ लाखांचा गंडा घातला . 'बाप नंबरी बेटा दस नंबरी' या हिंदी चित्रपटाला शोभेल अशी घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे.  या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी फरार बाप-लेकाला बंगळूरू शहरातून बेड्या ठोकल्या.

बहुचर्चित गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश जाधव आणि त्यांच्या पथकाने बुधवारी बंगळूरू शहरातून बाप-लेकाला उचलले.  विशेष म्हणजे मोबाईल लोकेशनच्या आधारे या बाप-लेकाच्या जोडीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुरुवारी दोघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता १४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राजन गडकरी आणि आनंद गडकरी अशी पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या बाप - बेट्याची नावे आहेत.

डोंबिवली पश्चिमेत राहणारे अमोल पळसमकर यांची डोंबिवली रेल्वे  स्टेशन परिसरात सोन्या - चांदीच्या दागिन्यांची पेढी आहे. काही महिन्यांपूर्वी या बाप - लेकाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माझे भाऊ आहेत. आयकर विभागाने पकडलेले सोने कमी किंमतीत मिळवून देतो, असे गडकरी बाप बेट्यानी पेढीचे मालक पळसमकर यांना अमिष दाखवले. पळसमकर यांनी बोलण्यावर विश्वास ठेवून गडकरी बाप-बेट्याला ५ लाख रुपये दिले. 

मात्र बराच कालावधी उलटून गेला तरी सोने दिले नाही. अखेर पेढीचे मालक पळसमकर २४ मे रोजी गडकरी यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता राजन आणि आनंद हे घर सोडून पसार झाल्याचे समजले. आपली फसगत झाल्याची खात्री पटताच पेढी मालक पळसमकर यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फसवणूकीची तक्रार नोंदवली. याच दरम्यान ओंकार पवार या तरुणासह इतर ७ ते ८ तरुण - तरुणींनाही गडकरी बाप बेट्याने नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही पैसे उकळल्याचे निष्पन्न झाले.

नातवाचे अपहरण केल्याचीही तक्रार : आनंदची पत्नी गीतांजली गडकरी (३०) हिने त्यांच्या दोन वर्षांच्या ऋग्वेद या बाळाचे पती आनंद गडकरी, सासरे राजन गडकरी आणि सासू अलका गडकरी यांनी घरातून दवाखान्यात डोस पाजण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन पळून नेल्याची लेखी तक्रार विष्णूनगर पोलिस ठाण्यात दाखल केली होती.  गडकरी बाप-लेक मुलालाही घेऊन बंगळूरूला गेले होते. या बाप-बेट्याला अटक केल्यानंतर त्यांच्या ताब्यातील मुलगा रूग्वेद याचाही ताबा त्याची आई गितांजलीकडे देण्यात आला आहे.