Sat, May 30, 2020 02:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्ज फिटले साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..!; शेतकर्‍याचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

कर्ज फिटले साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..!; शेतकर्‍याचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

Last Updated: Feb 25 2020 1:44AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. 

 

 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. 68 गावांमधील 15 हजार 358 शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर झाली. विधीमंडळाच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ही यादी जाहीर करण्यात आली. कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी झाला.

वाचा : पंतप्रधान मोदी हे 'ग्रेट चॅम्पियन ऑफ इंडिया' : ट्रम्प

विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, कृषी मंत्री  दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी मंत्री दिवाकर रावते, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते. 

यावेळी झालेल्या कार्यक्रमास नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, सहकार विभागाच्या सचिव आभा शुक्ला, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव दिलीप पांढरपट्टे आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पहिली यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर, परभणी, अमरावती व पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या जिल्ह्यांतील दोन पात्र लाभार्थी शेतकर्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. कर्जमुक्तीचा पहिला टप्पा हा हिंगोली जिल्ह्यातील समगा आणि खराबी गावापासून राबवला जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी समगा येथे जात आपले सरकार केंद्रांवर कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण केले. तसेच यावेळी बालाजी कुरवडे या पहिल्या शेतकर्‍याला कर्जमाफीची पावती देऊन सन्मान केला.

वाचा : ट्रम्प 'ताजमहल'च्या प्रेमात; दर्शन घेतल्यानंतर व्हिजिटर बुकमध्ये लिहिले....

राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली त्यात 15 हजार 358 लाभार्थ्यांची नावे आहेत. 68 गावांतील लाभार्थ्यांची ही पहिली यादी आहे. तसेच 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती संकलित करण्यात आली आहेत. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकर्‍यांना प्रमाणपत्रं दिले जात आहे. नुसता अंगठ्याचा ठसा देताच शेतकर्‍यांना कर्ज वितरीत केले जात आहे.

या कर्जमाफीबद्दल शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या समक्षच शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण केले. 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती रजिस्टर झाली आहे. अद्याप 1 लाख 61 हजार खात्यांची माहिती येणे बाकी आहे. आज प्रकाशित झाली यादी त्यामध्ये 68 गावातील 15 हजार 368 लोकांची नावे आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा समावेश आहे. 4500 जणांना आधार प्रमाणपत्र दिले. 24 तासात त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणार आहेत.

वाचा : राज्यातील दीड हजार ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले आणि हेरले या दोन गावातील नावांची यादी आज प्राथमिक टप्प्यावर जाहीर झाली आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत आसुर्ले इथं हे काम सुरु आहे.
972 शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. ब्राह्मणी (ता. राहुरी) गावातील 856, तर जखणगाव (ता. नगर) मधील 116 शेतकर्‍यांची नावे या यादीत आहेत. नगर जिल्ह्यात 2 लाख 15 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची माहिती आहे. तामलवाडी आणि पाथरूड या दोन गावातील 312 शेतकर्‍यांची यादी जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांनी जाहीर केली आहे.

236 शेतकर्‍यांचा कर्जमाफीच्या यादीत समावेश झाला आहे. हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या गावांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी भेट दिली. कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकर्‍यांना मिळावा, यासाठी यादी जाहीर झाल्यानंतर त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफी यादी जाहीर झाल्यांनतर शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती आहे.

वाचा : 'आज भारतात केवळ सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडिअम नाही तर...' 

कर्ज फिटले साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..!

साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही, तुम्हीही लग्नाला या असे आपुलकीचे आमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव गरूड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले तर पहिल्यांदा कर्जमुक्तीसाठी हेलपाटे मारावे लागले नाहीत, अशी भावना अहमदनगर जिल्ह्यातल्या पोपट मुकटे या शेतकर्‍याने मुख्यमंत्र्यांजवळ व्यक्त केली. या दोन्ही प्रातिनिधीक प्रतिक्रिया शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या यशस्वी अमंलबजावणीचे यश अधोरेखीत करणार्‍या ठरल्या.

या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का..किती हेलपाटे मारावे लागले, किती कर्ज होते, कुठल्या पिकाला कर्ज घेतले होते. आधीच्या आणि आताच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये काय फरक जाणवला असे प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांना विचारले. त्यावर योजनेबाबत शंभर टक्के समाधानी असल्याची भावना अहमदनगर जिल्ह्यातील पोपट मुकटे यांनी व्यक्त करताना मागील वेळेस पाच ते सहा वेळा चकरा माराव्या लागल्या आता केवळ एका थम्बवरच काम झाले, असे त्यांनी सांगितले.

परभणीच्या पिंगळी येथील विठ्ठलराव गरूड यांनी कर्जमुक्तीची रक्कम मिळणार असल्यानं चिंता मिटल्याची भावना व्यक्त केली आणि मुलीच लग्न जमलयं अशी आनंदाची बातमी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलीला कुठं दिलं अशी आपुलकीची विचारपूस करतानाच लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. हा संवाद ऐकताना हरखून गेलेल्या विठ्ठलराव यांनी लगोलग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मुलीच्या लग्नाचे आमंत्रणही दिले.

योजनेच्या यशाचे श्रेय यंत्रणेला : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यातील बळीराजांना कर्जमुक्तीतून चिंतामुक्त करणार्‍या या मोठ्या योजनेची अंमलबजावणी केवळ 60 दिवसांत झाली. याचे श्रेय यंत्रणेला असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना राबविताना आपण शेतकर्‍यांवर काही उपकार करीत आहोत अशी भावना ठेवू नका. शेतकर्‍यांचे आशिर्वाद आपण या माध्यमातून घेत आहोत त्यामुळे आपण लाभार्थी आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काही ठिकाणी अंमलबजावणी करताना उणिवा जाणवल्या तर शेतकर्‍यांनी नाराज होवू नये असे सांगतानाच शेतकर्‍यांचे प्रश्न समजून घेताना संमय ढळू देूऊ नका बळीराजाला दुखवु नका, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला केली.

कर्जमुक्तीसाठी योजना : उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बळीराजा कर्जमुक्त व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच भावनेतून ही योजना सुरू केली. कर्जमुक्त होऊन शेतकर्‍याला पुन्हा काळ्या आईची सेवा करता यावी. शेतीतून चांगले उत्पादन घेता यावे यासाठी राज्यशासनाने ही महत्वाकांक्षी योजना आणली. शेतकरी आनंदात रहावा त्याच्या मुलांच शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावे अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.