गणपतीला कोकणात जाण्याचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्याच हाती

Last Updated: Jul 15 2020 1:35AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोकणातील चाकरमान्यांना  गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी जाण्यासाठी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावा, असा निर्णय  कोकणातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत घेतला. कोकणातील लोकप्रतिनिधींची ही बैठक असतानाही राणे पिता-पुत्रांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नाही.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या गणेशोत्सवासाठी सरकारकडून ई-पासेस ते क्वारंटाईनसाठी सूट देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यासह  विविध प्रकारच्या शिफारशींचे एक पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यात येणार आहे.

मुंबईच्या तुलनेने कोकणात क्वारंटाईन व्यवस्था कमी आहे. त्यामुळे यंदा कमी प्रमाणात लोकांनी कोकणात जावे तसेच ज्यांची घरे बंद आहेत, त्यांच्यासाठी काय नियोजन असेल यावर या बैठकीत चर्चा झाली. तर बसेस व्यवस्था कशी करायची यावरून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर नियोजन केले जाईल, असे परब यांनी सांगितले.

राज्यात सध्या प्रवासाची आंतरजिल्हा परवानगी बंद करण्यात आली आहे. मोकळीक दिल्यास कोकणात जाणार्‍या भाविकांचा प्रवास सुलभ  होईल. विलगीकरण करण्यासाठी किती दिवस असतील, हे अद्याप ठरलेले  नाही. याबाबत परवानगी देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनाच असल्याचे परब यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणार्‍या चाकरमान्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. घरगुती गणपती कसा साजरा करायचा या संदर्भात सरकारकडून लवकरच नियमावली जाहीर केली जाईल, अशी माहितीही  त्यांनी दिली. माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या अनुपस्थिती बाबत विचारले असता, ही बैठक प्रशासनाची होती.  आम्ही कोणालाही निमंत्रण दिले नव्हते,  असे परब म्हणाले.