Fri, May 07, 2021 19:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विषाची परीक्षा नको, दुसरी लाट येऊ शकते!

विषाची परीक्षा नको, दुसरी लाट येऊ शकते!

Last Updated: Nov 23 2020 2:07AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊनच्या दिशेने जायचे नसेल तर कोरोना गेला असे समजून वावरू नका, विषाची परीक्षा घेऊ नका, सावध व्हा, असे स्पष्ट शब्दांत सांगताना खबरदारी घेतली नाही तर दुसरी लाट नव्हे, त्सुनामी येऊ शकते, असा निर्वाणीचा इशाराच राज्यातील जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी समाजमाध्यमातून संवाद साधताना दिला. कार्तिकी एकादशी  गर्दी न करता साजरी करा, असेही आवाहन त्यांनी केले.

कोरोनाची लस अजून आलेली नाही. त्यामुळे कोरोना संपला, असे समजून उगाच विषाची परीक्षा न घेता सध्या तरी गर्दी टाळणे, मास्क वापरणे आणि हात धूत राहणे ही त्रिसूत्री तुम्हाला पाळावीच लागेल, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दिवाळीनंतर कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महाराष्ट्रात अजून तरी कोरोनाची दुसरी लाट आली नसली, तरी दिल्ली, अहमदाबाद आणि सुरत यांसारख्या मोठ्या शहरांत कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा पाहायला मिळत असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. 

महाराष्ट्र सरकारने आरोग्य यंत्रणांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या असून, सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दुसरी लाट आलीच, तर ती परतवण्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी अन्य विषय टाळताना केवळ कोरोनाच्या बाबतीत जनतेला आवाहन केले.

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी असू शकते. अन्य ठिकाणची स्थिती पाहिल्यानंतर त्याचा आताच अंदाज येत आहे. त्यामुळे आतापर्यंत जसा संयम आणि शिस्त दाखवली तीच यापुढेही दाखवा, असे ठाकरे म्हणाले.

खबरदारी घेण्यापलीकडे आपल्या हातात सध्या काहीच नाही. सर्व काही खुले केले म्हणजे कोरोना गेला, असे समजू नका. गर्दी झाली तर कोरोना मरणार नाही, तर कोरोना वाढणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना घातक ठरतो. आताच्या लाटेत तरुणांनादेखील संसर्ग होत असून, हे फार गंभीर आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष करून तरुण घरात वावरले तर ज्येष्ठांना त्रास होणार आहे, असे ते म्हणाले.

अद्यापही लस हातात आली नाही. राज्यात 12 ते साडेबारा कोटी जनता आहे. या सर्वांना पहिला आणि दुसरा डोस द्यावा लागेल. याचा अर्थ 24 कोटी डोस द्यावे लागणार आहेत. लस कोणत्या तापमानात ठेवायची? कशी ठेवायची? हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. तोपर्यंत मास्क घाला, हात धुवा, अंतर पाळा हीच त्रिसूत्री पाळायला हवी. लस अद्याप आलेली नाही, कधी येणार त्याबाबत निश्चित कुणीच काही सांगत नाही.. एका नाजूक वळणावरून आपल्याला सहिसलामत पुढे जायचे आहे. कोरोनाचे कमी झालेले आकडे पुन्हा वाढू द्यायचे नाहीत. देशातील काही शहरांत रात्रीचा कर्फ्यू लावण्याचा निर्णय घ्यावा लागला असला, तरी आपल्याला तसे काही करायचे नाही. पुन्हा लॉकडाऊनही आपल्याला परवडणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर गर्दी टाळा. जे नियम ठरवले आहेत ते पाळा. उगाच विषाची परीक्षा घेऊ नका. गर्दी झाली तर कोरोना मरणार नाही तर वाढणार आहे, हे पक्के ध्यानात असू द्या, अशी कळकळीची विनंती आणि आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी निराशा केली : भाजप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेहमीप्रमाणे निराश करणारे फेसबुक लाईव्ह झाले. जनतेच्या नाराजीची दखल न घेता जनतेवरच नाराजी व्यक्त करणारे हे संबोधन होते. वीज बिलाबाबत काही तरी दिलासा मिळेल, असे वाटले होते; पण मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलले नाहीत, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.