Mon, Sep 21, 2020 11:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जव्हारच्या भूगर्भात जाणवले धक्के!

जव्हारच्या भूगर्भात जाणवले धक्के!

Published On: Dec 21 2017 2:10AM | Last Updated: Dec 21 2017 1:53AM

बुकमार्क करा

जव्हार : वार्ताहर

जव्हार शहरासह तालुक्यात मंगळवारी रात्री भूकंपसदृश धक्के जाणवल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. वाळवंडापैकी खडकीपाडा आणि पाथर्डी परिसरात पहिला धक्का रात्री 9.30 वाजता बसला. त्यानंतर अनुक्रमे 11.30 व मध्यरात्री 2 वाजता हे धक्के जाणवले. जव्हार शहरातही रात्री 11.30 च्या सुमारास मोठा हादरा बसला. भूकंपमापक यंत्रांवरील नोंदणी तपासल्या जात असून, आम्ही भूगर्भशास्त्रज्ञांनाही पाचारण केले असल्याचे तहसीलदार  संतोष शिंदे यांनी सांगितले.

जव्हारमधील 4 वर्षांपूर्वीची भूकंप तीव्रतामापक यंत्रे गायब

जव्हार : वार्ताहर

जव्हार शहरात चार वर्षांपूर्वी बसवलेली भूकंप तीव्रतामापक यंत्रे गायब झाल्याचे उघड झाले आहे. आता नव्याने ही यंत्रे बसवली जातील, अशी माहिती जव्हारचे तहसीलदार संतोष शिंदे यांनी दिली.

2013 मध्ये जव्हार शहरासह तालुका भूकंपाच्या धक्क्यांनी हादरल्यानंतर शहरात तत्कालीन तहसीलदारांनी नव्या राजवाड्यालगत हनुमान पॉईंट शेजारी दोन भूकंप तीव्रतामापक यंत्रे बसवली. त्यावेळी भूकंपांची नोंदही झाली. मंगळवारी रात्री शहरापासून 15 कि.मी अंतरावरील वळवंडा, खडकीपाडा आणि पाथर्डी या परिसरातील गावांना अचानक भूकंपाचे धक्के बसल्याने अवघा तालुका हादरला. या पार्श्‍वभूमीवर भूकंपाची तीव्रता किती नोंदवली गेली, हे पाहण्यासाठी तहसीलदार संतोष शिंदे हनुमान पॉईंट येथील यंत्रे पाहण्यासाठी गेले असता, ती यंत्रेच जागेवर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जव्हार शहर व तालुक्याला मंगळवारी किती क्षमतेचे धक्के बसले, याची मोजणी होऊ शकली नाही.

 वाळवंडा भागात बुधावारी संध्याकाळी 7  च्या सुमारास पुन्हा भूकंपाचे धक्के  बसल्याचे ग्रामस्थांनी आम्हाला फोनवर सांगितले, अशी माहिती तहसीलदार संतोष शिंदे यांनी दिली.