Mon, Aug 03, 2020 14:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांसह लाखो भीमसैनिकांचे महामानवाला अभिवादन 

मुख्यमंत्र्यांसह लाखो भीमसैनिकांचे महामानवाला अभिवादन 

Published On: Dec 06 2017 9:08AM | Last Updated: Dec 06 2017 9:08AM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी शिवाजी पार्कात पोहोचले आहे. त्यामुळे संपूर्ण दादर परिसर भीमअनुयायांनी गजबजून गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला महिनाभरात सुरुवात होईल, टेंडर निघाले आहे, अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव , शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले. 
दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी लाखो भीमसैनिक बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दाखल होतात. मात्र, यंदा ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या पावसाने शिवाजी पार्कात चिखल झाला आहे. तरीही भीमसैनिकांचा शिवाजी पार्ककडे येणारा ओघ सुरुच आहे.

भीमसैनिकांसाठी महापालिकेने शिवाजी पार्क मैदानात बांधलेल्या मंडपाला ताडपत्र्या नसल्याने आंबेडकरी अनुयायांना पावसात भिजावे लागले. पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांना पालिकेच्या शाळांमध्ये हलवण्यात आले. मात्र, शाळेला आधी कळवले नसल्याने शाळेने आनुयायांना आतमध्ये घेण्यास नकार दिला. काही वेळानंतर शाळेने त्‍यांना राहण्यास परवानगी दिली. पालिकेच्या ७० शाळांमध्ये अनुयायांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानात पावसामुळे चिखल झाला आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास मंडप कोसळून शॉट सर्किट झाले. या दुर्घटनेत तीन अनुयायी जखमी झाले असून, त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दादर रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या अनुयायींना विनाशुल्क बेस्ट बसद्वारे उपलब्ध शाळांमध्ये नेण्यात येत होते. महापालिकेचे २४ विभागीय नियंत्रण कक्ष सतर्क ठेवण्यात आले असून, आवश्यक तेथे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. वैद्यकीय सेवेच्या रुग्णवाहिका तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. धारावी, माटुंगा लेबर कॅम्प, दादर, नायगाव, परेल, माहीम, खेरवाडी येथील शाळा, समाज मंदिरातही अनुयायांची व्यवस्था करण्यात आली.