Sun, Aug 09, 2020 10:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉक्टर संप चिघळणार

डॉक्टर संप चिघळणार

Published On: May 22 2018 1:39AM | Last Updated: May 22 2018 1:17AMमुंबई : प्रतिनिधी

रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केल्यानंतर जे.ज.े रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपात आता इतर रुग्णालयांतील डॉक्टरही उतरले असून, संप चिघळण्याची चिन्हे आहेत. 

जे.जे. रुग्णालयातील 400 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर गेले असून, आता मुंबईतील सायन, कामा, जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयांच्या डॉक्टरांनी जे.जे.च्या डॉक्टरांना पाठिंबा देत सोमवारी हाताला काळ्या रिबिन बांधून आंदोलन केले. जे.जे. आणि सायन रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय सेवा न देण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी डॉक्टरांनी रुग्णालयाबाहेर बाह्यरुग्ण विभाग सुरू करून रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळवून दिली.

सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील निवासी डॉक्टरही सोमवारपासून  सुट्टीवर गेले आहेत. सुमारे 450 निवासी डॉक्टरांनी कामावर अनुपस्थित राहात सोमवारी कामबंद आंदोलनाची हाक दिली. के. ई. एम. रुग्णालयाने काम बंद न करता जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी सायंकाळी कँडल मार्च करण्यात आला. 

जीटी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद तायडे यांनी सांगितले की, जे.जे. रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आता जीटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सुद्धा संपाला पाठिंबा दिला आहे. या संपामुळे रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांनी कामाला सुरुवात केली आहे.

सेंट जॉर्जमधील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील कांबळे म्हणाले, या रुग्णालयात साधारणतः 30 निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. रविवारी रात्रीपासून हे सर्व डॉक्टर सामूहिक रजेवर गेले आहेत. डॉक्टरांनी पुकारलेल्या या संपानंतर सध्या तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि इंटर्न डॉक्टर काम करत आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर कुठलाही परिणाम झालेला नाही. बाह्यरुग्ण विभागात तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करत आहेत. शस्त्रक्रिया देखील सुरू आहेत. आपत्कालीन रुग्णांना डॉक्टर दाखल करून घेऊन उपचार देत आहेत.