मुंबई : पुढारी ऑनलाईन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरु केले आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
अधिक वाचा : कोरोनामुळे आता केवळ १५% कर्मचार्यांच्या बदल्या
याचबरोबर आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहाची अज्ञातांकडून तोडफोड! (video)
दादर येथील 'राजगृह' या डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली आहे.