Fri, Sep 18, 2020 22:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कांदा निर्यातबंदी; राज्याचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार

कांदा निर्यातबंदी; शिष्टमंडळ दिल्लीला जाणार

Last Updated: Sep 17 2020 8:32AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कांदा निर्यातबंदीमुळे होणारे शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली. या शिष्टमंडळात महाविकास आघाडीमधील ज्येष्ठ मंत्री आणि कृषी तज्ज्ञांचा समावेश असेल. येत्या दोन दिवसांत दिल्लीला जाण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही भूसे म्हणाले.

देशातील एकूण कांदा उत्पादनाच्या तुलनेने महाराष्ट्रात 75 टक्के उत्पादन घेतले जाते. निर्यातीमध्ये सुद्धा जवळपास 80 टक्के कांदा हा राज्यातील शेतकरी बांधवांचा असतो. त्यामुळे या बांधवांचे मोठे नुकसान होईल, असे  राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले.

याचबरोबर कांद्यावर निर्यातबंदी लादून केंद्र सरकारने शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केला, असा आरोप करत या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा  इशारा अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, डॉ.अजित नवले, जे. पी. गावीत आदींनी दिला. या सुरू असलेल्या हंगामात कांद्याचे देशात विक्रमी उत्पादन झाले होते. 

आंध्र प्रदेश व कर्नाटकातील कांदाही बाजारात येणार आहे. कांद्याच्या टंचाईची समस्या नजीकच्या काळात दिसत नसताना कांद्यावर निर्यातबंदी लादून देशभरातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा केंद्र सरकारने बळी दिला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 
 

 "