Wed, Dec 11, 2019 19:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेना खासदाराच्या  गाडीने हरिण चिरडले

सेना खासदाराच्या  गाडीने हरिण चिरडले

Last Updated: Dec 03 2019 1:30AM
मुंबई : प्रतिनिधी

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या चारचाकी वाहनाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एका हरणाला चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवार 27 नोव्हेंबर सायंकाळी 6.30 मिनिटांनी ही घटना घडली.यात जखमी झालेल्या हरणाचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघाताच्या वेळी गावित गाडीमध्ये नव्हते, अशी माहिती उद्यानाचे मुख्य वन संरक्षक अन्वर अहमद यांनी दिली. याप्रकरणी गाडीचालक जॉर्ज पॉल डिसोजा याच्याविरोधात कस्तुबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क उद्यानात बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर हरणाला तातडीनं पार्कमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं त्याला डॉक्टरानी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसानी एस यूव्ही कार एम. एच-48- बीएच-9909 पोलिसांनी जप्त केली असून चालकालाही अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्यानातील कर्मचार्‍यांच्या माहितीनुसार 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास खा.गावित यांची एसयूव्ही कार उद्यानाच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. त्याचक्षणी गांधी टेकडीजवळ उभ्या असलेल्या एका हरणाला या कारची जोरदार धडक बसली.

अपघातानंतर याची माहिती चालकाने स्वतःहून मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांना दिली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी हरणाला प्राण्यांच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, तोपर्यंत वाटेतच हरणाचा मृत्यू झाला होता.