होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वैद्यकीय प्रवेशासाठी वटहुकूम काढणार!

वैद्यकीय प्रवेशासाठी वटहुकूम काढणार!

Published On: May 16 2019 2:15AM | Last Updated: May 16 2019 2:15AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश रद्द झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी, राज्य सरकारने वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न आणि तातडी पाहता वटहुकूम काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया 25 मेपर्यंत पूर्ण करण्याची मुदत न्यायालयाने दिली आहे. ही मुदत देखील 31 मेपर्यंत वाढविण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडेही वैद्यकीय प्रवेशाच्या जागा वाढवून मागण्यात आल्या आहेत. 

महसूल मंत्री व मराठा आरक्षण अंमलबजावणी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चाच्या समन्वयक तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी मंत्रालयात चर्चा केली. या चर्चेत राज्य सरकार मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. राज्य सरकार एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ देणार नाही, अशी हमीही त्यांनी दिली. त्यामुळे प्रवेशाच्या मुद्द्यावर निर्माण झालेली कोंडी सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रद्द झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश कायम व्हावेत, म्हणून मराठा विद्यार्थ्यांनी गेले आठवडाभर आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि संबंधित विभागाचे अधिकारी, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आणि विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणाचे सर्व प्रकारचे फायदे मराठा समाजाला मिळावेत, म्हणूनही सरकार सक्रिय आहे. मराठा आरक्षण वटहुकुमामधील तांत्रिक त्रुटीमुळे मराठा विद्यार्थ्यांचे वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश रद्द झाले आहेत. मात्र, सरकार हे प्रवेश कायम करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या विषयात जातीने लक्ष घातले आहे. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. राज्य सरकारने यासंबंधी निर्णय घेण्यासाठी आचारसंहिता असल्यामुळे निवडणूक आयोगाला विनंती केली असून, ही विनंती मान्य होताच सर्वांचे समाधान होईल, असा निर्णय सरकार घेईल.

आंदोलन चालूच राहणार

मराठा आरक्षणाच्या माध्यमातून पहिलीच डॉक्टरांची टीम बाहेर पडणार आहे. त्यामुळे हे प्रवेश रद्द झाल्यास मराठा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हे नुकसान सरकारने टाळावे आणि विद्यार्थ्यांना ज्या शाखेला आणि ज्या ठिकाणी प्रवेश मिळाले ते कायम करावेत, अशी विनंती मराठा समाजाच्या प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांनी पाटील यांना केली. तसेच जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत आझाद मैदानातील आंदोलन कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. 

सर्वोच्च न्यायालयाला मुदतवाढीची विनंती

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने 25 मेची मुदत दिली आहे. सध्या प्रवेशाचा निर्माण झालेला तिढा व राज्य सरकारने केंद्र सरकारला जागा वाढवून देण्याची केलेली मागणी पाहता या प्रक्रियेसाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्र सरकारकडे वैद्यकीय प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, 23 तारखेपर्यंत निवडणूक आचारसंहिता आहे. त्यानंतरही केंद्रात नवीन सरकार स्थापन झाल्याशिवाय जागा वाढविण्याचा निर्णय होऊ शकणार नाही. त्यामुळे प्रवेशांसाठी मुदतवाढ मागितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

‘वर्षा’वर बैठकांचे सत्र 

दरम्यान, वैद्यकीय प्रवेशाचा तिढा लवकरात लवकर मिटावा म्हणून ‘वर्षा’वर बैठका सुरू आहेत. मंगळवारी रात्रीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली. या बैठकीत विविध पर्याय तपासण्यात आले असून, सुधारित वटहुकूम काढण्यावर एकमत झाले. मात्र, आचारसंहिता असल्याने निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतरच त्यावर निर्णय घेण्याचे ठरले.

खा. संभाजी राजेंनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

वैद्यकीय प्रवेश रद्द झालेल्या मराठा विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी खासदार संभाजीराजे यांनीही भेट घेतली. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच त्यांनी राज्य सरकारने विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी तत्काळ वटहुकूम काढावा, अशी मागणी केली. मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण देऊ केले आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांनी आरक्षित जागेतून प्रवेेश घेतले. हे प्रवेश रद्द झाले असतील, तर ती या विद्यार्थ्यांची चूक नाही.