भिवंडी इमारत दुर्घटना : २० जणांचा मृत्यू

Last Updated: Sep 22 2020 9:38AM
Responsive image


भिवंडी : पुढारी ऑनलाईन 

काल पहाटे भिवंडी येथील पटेल कंपाऊंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घेटनेतील मृतांची संख्या २० वर पोहोचली आहे. पटेल कंपाऊंड येथील सुमारे ४३ वर्षे जुनी एल टाइपमधील ही जिलानी बिल्डिंग धोकादायक म्हणून महानगरपालिकेने घोषित करून या इमारतीस दोन वेळा नोटीस बजावली होती. या इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून मजले गाडले. घटनास्थळी अग्निशामक व ठाणे येथील TDRF व NDRF च्या जवानांनी मदतकार्य केले. ढिगाऱ्याखालून काढलेल्या जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाचा : मोडकळीस आलेल्या सर्व इमारतींसाठी तत्काळ कृती आराखडा तयार करा!

इमारत दुर्घटनेनंतर तातडीने ठाणे महानगर पालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले. ही इमारत ४३ वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारतीतील ४० फ्लॅट्समध्ये १५० रहिवाशी वास्तव्यास होते. सदर इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती, असे भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिल्या. दुर्घटनेमध्ये मृत्यू  झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

वाचा : मराठा समाजाच्या सवलतींवर येत्या दोन दिवसांत निर्णय