Sat, Apr 10, 2021 19:41




कोरोना संकटातही गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी : नाना पटोले

Last Updated: Apr 08 2021 6:17PM





मुंबई : पुढारी वृत्तसेवा

देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान देशाच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अतीसक्रिय झाले आहेत. त्यांनी अत्यंत हीन पातळीवर जाऊन असंवेदनशील आणि अशोभनीय भाषेचा वापर करत महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसांचा अपमान केला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

अधिक वाचा : भाजपला धक्का; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त

मुंबई येथे पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व भाजपाचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना जनाची तर नाही मनाची थोडीफार शिल्लक असेल तर केंद्राचा कैवार घेऊन महाराष्ट्रावर खोटेनाटे आरोप करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा नतद्रष्टपणा आणि महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा झोपलेल्या केंद्र सरकारला जागे करून महाराष्ट्रासाठी आवश्यक कोरोना लस, रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन व इतर अत्यावश्यक औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यास सांगावे.

अधिक वाचा : IPL डोस : पहिली सुपर ओव्हर कधी झाली माहीत आहे?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नियोजन करणे ही राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन कायदा २००५ नुसार जबाबदारी होती. परंतु तिचे पालन न करता देशातील नागरिकांच्या जीविताचा विचार न करता केंद्र सरकारने देशातील केवळ ८ कोटी नागरिकांना लस दिली. पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रासहित इतर देशांना मोठ्या प्रमाणात मोफत लस पाठवली आहे. लसीचा पुरवठा, लसींची उपलब्धता, रेमडेसीविर व ऑक्सीजनचा पुरवठा याबाबतीत वस्तुनिष्ठ निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकार आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटे आरोप करून देशाची दिशाभूल करत आहे, असे पटोले म्हणाले.