Wed, Aug 12, 2020 03:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; दोन महत्त्वाच्या कारणांसाठी घातले साकडे!

काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; दोन महत्त्वाच्या कारणांसाठी घातले साकडे!

Last Updated: Dec 11 2019 6:17PM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदनही दिले.  पंजाब अँड महाराष्ट्र (पीएमसी) बँकेच्या खातेधारकांच्या प्रश्नांवर व समस्यांवर लवकरात लवकरात तोडगा काढण्यात यावा, तसेच भीमा कोरेगाव आंदोलन प्रकरणात दलित आंदोलनकर्त्यांवरील केसेस मागे घेण्यात याव्यात, त्याचप्रमाणे काँग्रेस तर्फे ठिकठिकाणी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवरील केसेस मागे घेण्यात याव्यात अशी मागणी निवेदनात केली आहे. 

या शिष्टमंडळामध्ये एकनाथ गायकवाड यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार चरणसिंग सप्रा, माजी आमदार भाई जगताप, मुंबई काँग्रेसचे समन्वयक राजेश भाई ठक्कर आणि मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष संदीप शुक्ला यांचा समावेश होता. 

याबद्दल अधिक माहिती देताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड म्हणाले की, पंजाब अँड महाराष्ट्र (पीएमसी) बँकेचे १६ लाख खातेधारक मागील ८० दिवसांपासून त्यांचे स्वतःचे बँकेत जमा असलेले पैसे परत मिळावेत यासाठी बँकेचे खेटे घालत आहेत. आंदोलन करत आहेत. हा मुद्दा संसदेत सुद्धा उपस्थित झालेला आहे. तरीसुद्धा या खातेधारकांना अजून न्याय मिळाला नाही. १८ खातेधारकांचा या दरम्यान मृत्यू झाला आहे. या खातेधारकांना त्यांची जमा असलेली रक्कम परत मिळायला हवी. त्यासाठी सरकारने लवकरात रिव्हायवल पॅकेज जाहीर करण्याची किंवा पीएमसी बँकेचे दुसऱ्या सशक्त बँकेमध्ये विलीनीकरण करण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे. त्यात आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी प्रकरणांत लक्ष घालावे व त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा.

तसेच २०१८ साली भीमा कोरेगाव येथे जी घटना झाली होते. त्याविरोधात तेथे मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्या दलित आंदोलनकर्त्यांवर अजूनही केसेस सुरु आहेत, ते अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आम्ही या निवेदनामध्ये मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की, त्यांनी लवकरात लवकर या आंदोलनकर्त्यांवरील केसेस मागे घेण्यात याव्यात व त्यांना न्याय द्यावा. 

मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईत ठिकठिकाणी मुंबईकरांच्या प्रश्नांवर, त्यांच्या समस्यांवर आंदोलने करण्यात येतात. त्यात शेकोडो आंदोलनकर्ते सहभागी होतात. त्यांना अटक केली जाते. त्यांच्यावर केसेस दाखल केल्या जातात. ही आंदोलने मुंबईकरांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असतात आणि म्हणूनच आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये, त्यांना विनंती केली आहे की या आंदोलनकर्त्यांवरील केसेस मागे घेण्यात याव्यात, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली.

यावेळी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याजवळ मागणी केली की, त्यांनी  पीएमसी बँकेसाठी विलीनीकरण किंवा रिव्हायव्हल पॅकेजच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आरबीआय गव्हर्नर आणि महाराष्ट्र राज्य प्रशासन यांची संयुक्त बैठक घ्यावी व यावर तोडगा काढावा.