मुंबईत थंडीचा पारा 18 अंशांवर!

Last Updated: Dec 15 2019 1:04AM
Responsive image


मुंबई : प्रतिनिधी

एरव्ही नोव्हेंबर महिन्यातच मुंबई आणि उपनगरांना थंडीची चाहूल लागते. यावेळी थंडी दाखल होण्यास महिनाभर उशीर झाला. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांत गारवा वाढला आहे. रायगड तसेच ठाणे जिल्ह्यातील काही भागात 18 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आल्याने हुडहुडी सारखी अवस्था निर्माण झाली आहे.

उत्तरेतील हवामान बदलाचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली गेेले असून मुंबई, ठाणे, नवी मुुंबई आणि रायगड जिल्ह्यातही थंडीचे आगमन झाले आहे. थंडीसोबतच धुक्याचे प्रमाणही वाढले आहे.

मुंबईत शनिवारी कुलाबा येथे 19.3 तर सांताक्रूझला 18.0 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. या वर्षीचे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस थंडीची तीव्रता वाढत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईत गेल्या वर्षी 28 डिसेंबर रोजी सर्वात कमी 14.4 अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ही आकडेवारी दशकभरातील सर्वात कमी होती. मुंबईत आजवर सर्वात कमी 10.6 अंश सेल्सिअस तापमान 20 डिसेंबर 1949 मध्ये नोंदले गेले आहे.

राज्यात थंडीची तीव्रता वाढत आहे, याबाबत स्कायमेट या हवामान विभागाचे उपाध्यक्ष महेश पलावत म्हणाले, देशभरात तापमानात लक्षणीय घट होत असून, दिल्लीचे तापमान 12 अंश पर्यंत आले आहे. वास्तविक या दिवसांत ते 6 ते 7 अंश इतके असते. पश्‍चिम हिमालयाकडून उत्तर-पूर्वेच्या दिशेने वेगाने वारे वहात असल्याने देशभरात थंडीची तीव्रता वाढली आहे. त्यातूनच हिमाचल आणि काश्मिरच्या अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण आणखीनच वाढणार आहे. दरम्यान, कपड्याची दुकाने आणि मॉल्समध्ये गरम कपडे दिसू लागले आहेत.