Tue, Aug 11, 2020 21:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : शेलवलीनजीक टँकरमधून घातक रसायने सोडून पोबारा 

ठाणे : शेलवलीनजीक टँकरमधून घातक रसायने सोडून पोबारा 

Last Updated: Dec 07 2019 10:23AM

ठाणे : शेलवलीनजीक टँकरमधून घातक रसायने सोडून पोबारा शहापूर ग्रामीण (ठाणे) : प्रतिनिधी

तालुक्यातील शहापूर -शेणवा या मार्गावरील शेलवली गावानजीकच्या परिसरात काही अज्ञात टँकरमधून रात्रीच्या सुमारास  घातक रसायने सोडण्याचा प्रकार समोर आला आहे. शेलवली खिंड व गावानजीक मोठ्‍या प्रमाणात केमिकलयुक्त रसायन सोडल्याने गेल्या आठ दिवसांपासून या हद्दीत दुर्गंधी पसरली आहे. उग्र वास येत असल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना श्वसनाच्या विकारांसह आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेळीच लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

मुंब्रा बायपास रस्त्याचे काम गतवर्षी हाती घेण्यात आले होते. त्यामुळे पुणे, नगर, कल्याण, खोपोली या व इतर ठिकाणी जाण्यासाठी पनवेल विभागाने शहापूर- शेणवा, किन्हवली या पर्यायी मार्गाचा अवलंब केला होता. त्यामुळे या मार्गावरुन मोठ्‍या प्रमाणात मालवाहू ट्रक, टँकर, कंटेनर याद्वारे अवजड वाहतूक सुरु होती. आजही मोठ्‍या प्रमाणात ही वहातूक सुरुच आहे. या मार्गावरुन केमिकलयुक्त रसायनांची वाहतूक होत आहे. 

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून शेलवली खिंड परिसरातील प्रस्तावित समृध्दी महामार्गाच्या जागेत व अन्य ठिकाणी रात्रीच्‍या वेळी काही अज्ञात टँकरमधून घातक रसायने सोडली जात आहेत. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी हे रसायन सोडले आहे तेथील गवत पूर्णपणे करपले आहे. शिवाय वनविभागाचे राखीव जंगल असल्‍याने या घातक रसायनांमुळे आसपासच्या जंगलसंपत्तीसह शेतजमिनींवरही त्याचा विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान शहापूर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी  घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला आहे.

शेलवली परिसरात अज्ञात टँकरमधून रसायने सोडली गेली असल्याचे समजले आहे. तलाठी यांचेमार्फत पहाणी करुन अहवाल प्राप्त झालेनंतर  पुढील कार्यवाही केली जाईल.
निलिमा सुर्यवंशी, तहसिलदार शहापूर