मुंबई: पुढारी ऑनलाईन
शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये पाण्यावरून चांगलाच राडा झाला आहे. या भांडणात नगरसेविका प्रेमा म्हात्रेंनी शिवसेनेच्याच नगरसेविका आशालता बाबर यांच्या कानशिलात लगावली. हा सर्व प्रकार शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयाबाहेरच घडला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) शिवसेना नगरसेवकांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. केडीएमसीच्या शिवसेना नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही, शिवसेना नगरसेविका आशालता बाबर यांनी केली आहे. मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये या तक्रारीची नोंद झाली आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
पाण्यावरून महाराष्ट्रातील अनेक भागात राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. याचे लोण आता ठाण्यासारख्या शहरी भागातही पोहचले आहे. पाणीप्रश्नावरून शिवसेनेच्या दोन नगरसेविका समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. दोघींच्या चांगलीच बाचाबाची झाली. बाचाबाचीनंतर प्रेमा म्हात्रे यांनी आशालता बाबर यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. मात्र मारहाण केली नसल्याचा दावा नगरसेविका म्हात्रे यांनी केला आहे.
आशालता बाबर या नांदिवली मिनल पार्क या प्रभागाच्या नगरसेविका आहेत. रवीकिरण सोसायटीच्या पाणीप्रश्नावरुन बाबर आणि म्हात्रे यांच्यात वाद झाला. या सोसायटीला पाणी दिल्यास आपल्या प्रभागात परिणाम होईल म्हणून बाबर आणि म्हात्रे आमने सामने आल्या. वादावादीनंतर हा मुद्दा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे आणि त्यानंतर चर्चेसाठी शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयात गेला. त्यावेळी झालेल्या झटापटीत प्रेमा म्हात्रे यांनी आशालता बाबर यांना कानशिलात मारल्याचा आरोप आहे.