Thu, Jul 09, 2020 23:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिडकोच्या कामावर कॅगचे ताशेरे; तर फडणवीस म्हणतात...

सिडकोच्या कामावर कॅगचे ताशेरे; फडणवीस म्हणाले...

Last Updated: Mar 04 2020 5:37PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

कॅगचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कॅगच्या अहवालामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

कॅगच्या अहवालात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पात अनियमितता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विमानतळाच्या कामात १६ निविदांमध्ये अनियमितता असल्याचे अहवालात म्हटले आहे. या प्रकल्पातील ५० कोटींपेक्षा जास्त कामांच्या १६ निविदा या राष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य वर्तमानपत्रात जाहिरात न देताच बहाल करण्यात आले असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

कोणताही अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना ८९० कोटींची कामे देण्यात आली. तब्बल ४३० कोटींच्या १० कंत्राटांमध्ये मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. या कामांमध्ये अस्तित्वात असलेल्या कंत्राटदारांना विविध कामांच्या जागेसाठी ६९.३८ कोटी मुल्याची अतिरिक्त कामे निविदा न मागवता प्रदान करण्यात आली. यामध्ये पारदर्शकता नव्हती, असे देखील या अहवालात म्हटले आहे.   

तसेच, नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील कामात टेकडी कापण्यासाठी २०३३ कोटी तीन कंत्राटांमध्ये देण्यात आले. त्याच टेकडीपासून निघालेल्या दगडांनी भरणा केला होता. तरी सुद्धा २२.०८ कोटींचा फरक दाखवण्यात आला. तसंच, कामाच्या विलंबासाठी कंत्राटदाराकडून १८६ कोटी वसूल करायला हवे होते. मात्र, सिडकोने ते वसूल केले नाहीत, असे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले...

फडणवीस सरकारच्या काळात कॅगच्या अहवालात अनियमितता असल्याचे म्हटल्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. कॅगच्या अहवालात २०१३ एप्रिलपासून २०१८ पर्यंतच्या सिडकोच्या विविध कामांचे अवलोकन केलेले आहे. हा अहवाल येण्याआधीच सिलेक्टिव्ह लिकेज झाले तेसुद्धा आक्षेपार्ह आहे, असे फडणवीसांनी म्हटले आहे. 

तसेच ते म्हणाले, तीन इन्फ्रा प्रोजेक्ट्सच्या कामांचा यात उल्लेख आहे. नवी मुंबई मेट्रो रेल, नेरुळ-उरण रेल्वे आणि नवी मुंबई एअरपोर्टच्या टेंडर संदर्भात बाबींवर आक्षेप घेतले आहेत. यातले नवी मुंबई मेट्रो रेल आणि नेरुळ-उरण रेल्वे या दोन्ही प्रकल्पाच्या सर्व निविदा आणि निर्णय २०१४ पूर्वीचे आहेत. त्या काळात टेंडर ऑगस्ट २०१३ ते अॅडव्हान्स पेमेंट सप्टेंबर २०१४ च्या आहेत.