रक्तबंबाळ, भुकेने व्याकुळ होऊन चालत घरी गेलेल्या मजुरांसाठी आता 'पायघड्या'

Last Updated: Jun 07 2020 9:32AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये बेकारी लादली आणि परिणामी ज्या कामगारांना कधी पायी चालत तर कधी ट्रक, ट्रॅक्टरमधून गुरागत कोंबून कोंबून प्रवास करावा लागला. त्याच स्थलांतरीत कामगारांना परत आणण्यासाठी आता वाट्टेल ते करण्याची तयारी देशभरातील व्यावसायिकांनी, कारखानदारांनी आणि बिल्डरांनी चालवली आहे.

कुणी तिप्पट पगार देऊ केला, कुणी चार चाकीचे आश्‍वासन दिले, कुणी वातानुकूलित रेल्वे बुक करतोय तर काही बिल्डर मंडळी आपल्या ‘प्रिय’ मजुरांना परत आणण्यासाठी आता चक्‍क विमान पाठवणार आहेत. अशाच तर्‍हेचे बरे निरोप कानी पडताच आपापल्या राज्यांत गेलेले मजूर पुन्हा मुंबई गाठण्याच्याही तयारीत आहेत.

लॉकडाऊननंतर बिहारला गेलेल्या 150 कुशल कामगारांना परत आणण्यासाठी चेन्नईच्या बांधकाम क्षेत्रातील तीन विकासकांनी 15 जूनला एक खासगी विमान बुक केले आहे. याशिवाय तामिळनाडूमधील क्रेडाई या बांधकाम विकासकांच्या संघटनेने गावाकडे गेलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी परतण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे.

पंजाबच्या भटींदा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी तर शेजमजुरीसाठी मजूर मिळत नसल्याने 3 जूनला एक बस बिहारच्या दरभंगा येथे धाडल्याचे वृत्तही हाती आले आहे. दरभंगा येथील विविध गावांतून तब्बल 50 शेतमजुरांना घेऊन ही बस परतली आहे. लुधियाना येथील शेतकर्‍यांनीही दरभंगा जिल्ह्यातील हरिपूर गावातून 30 शेतमजुरांना परत आणण्यासाठी स्वतंत्र बस पाठवल्याची माहिती आहे.

केरळमध्ये तर स्थलांतरित कामगारांसाठी सरकारने अक्षरशः सुविधांच्या पायघड्याच घातल्या आहेत. बांधकाम कामगारांना आकर्षित करण्यासाठी ‘आवास फॉर ऑल गेस्ट वर्कर्स’ अर्थात ‘प्रत्येक स्थलांतरित कामगारासाठी निवारा’ या योजनेची सरकारने घोषणा केलेली आहे. या योजनेत नोंदणीकृत कामगारांना सरकारने निश्चित केलेल्या रुग्णालयांत 25 हजार रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय सेवा मिळणार आहे.

तसेच कामादरम्यान कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला तब्बल 2 लाख रुपयांची आर्थिक मदतही मिळणार आहे. इतकेच नव्हे, तर केरळ सरकारकडून स्थलांतरीत कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात अपना घर हौसिंग कॉम्प्लेक्सेसची बांधणी सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये पलक्कड येथे कामास सुरूवात झाली असून एर्नाकुलम, कोझिकोड आणि थिरुवनंथपूरम याठिकाणी मोठ्या वसाहती बांधण्याचे नियोजन झाले आहे.

मुंबई महानगरातील बांधकाम विकासकही त्यांच्या मजुरांना फोन करून गावावरून परतण्यासाठी विनवण्या करत आहेत. नरेडको (नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल) या बांधकाम विकासकांच्या संघटनेचे उपाध्यक्ष राजन बांदेलकर यांनी सांगितले की, कंत्राटदार आणि वरिष्ठ अभियंते कामगारांच्या थेट संपर्कात आहेत. कामगारांना सुरक्षेची खात्री देत कामावर परत येण्याचे आवाहनही केले जात आहे.