कुर्ला : प्रतिनिधी
वडाळा भक्तीपार्क येथे गिरनार हाईट्स या 18 मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून एका 13 वर्ष्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रियान चक्रवर्ती असे या मुलाचे नाव असून तो याच इमारतीत 16 व्या मजल्यावर त्याच्या आई वडिलांसह रहात होता.
गुरुवारी दुपारी क्लासवरून घरी आल्यानंतर त्याने कपडे बदलले आणि तो थेट इमारतीच्या टेरेसवर गेला आणि तिथून खाली उडी मारली. घटनेची माहिती मिळताच वडाळा टिटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन येथील टिळक रुग्णालयात पाठविला आहे.
या आत्महत्येचे कारण मात्र समोर आले नाही. रियान हा त्यांच्या आई वडिलांच्या एकुलता एक मुलगा होता. तो शिक्षणासह इतर खेळ आणि इतर गोष्टीत हुशार होता. त्याच्या आत्महत्येने त्याच्या शेजाऱ्यांना धक्का बसला आहे. या आत्महत्येची नोंद वडाळा टिटी पोलिसांनी केली असून सीसीटीव्ही आणि इमारती मधील रहिवाश्यांच्या, नातेवाईकांच्या मदतीने या आत्महत्येच्या कारणाचा पोलिस शोध घेत आहे.