Tue, Sep 22, 2020 06:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पक्षाचे नाव ठेवताना वंशजांना विचारले होते का, उदयनराजेंचा सवाल

पक्षाचे नाव ठेवताना वंशजांना विचारले होते का, उदयनराजेंचा सवाल

Last Updated: Jan 14 2020 1:25PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारं ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यात आलं आहे. परंतु यावर उठलेले वादंग अद्याप निवळलेले नाही. वादग्रस्त पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवर निशाणा साधला होता. राऊतांचा हाच मुद्दा उचलुन उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्तेवर असणाऱ्या पक्षाला चांगलेच धारेवर धरले. 

लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा प्रश्न पडतो असे यावेळी उदयनराजे यांनी म्हटले. पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटले. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटले. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले.  पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना महाराजांसोबत करणे चुकीचे आहे. शिवरायांचे गुण अंगीकरण्याचा आणि त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा असा सल्ला उदयनराजेंनी दिला. 

 हे ही वाचा► छत्रपतींच्या वंशजांचे शिवसेनेकडून कौतुक

एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो, असे यावेळी उदयनराजे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होते. प्रेरणा मिळते. अंगावर शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही, असे यावेळी ते म्हणाले.

उदयनराजे यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले. शिवसेना नाव दिले तेव्हा वंशजांना विचारले होते का? असा सवाल यावेळी उदयनराजे यांनी केला. सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसर पडणे हीच यांची लायकी अशा शब्दांत उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका केली. शिववडा असे नाव ठेवता तेव्हा आदर कुठे जातो. वडा-पावला महाराजांचे नाव कसे काय दिले जाऊ शकते अशी विचारणादेखील यावेळी त्यांनी केली.

हे ही वाचा► अर्थिक मंदीचा फटका १६ लाख रोजगारांना

तसेच, उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेना भवनचा फोटो दाखवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराजांच्या फोटोंच्या जागेवरुन टीका केली. यापुढे तोंडातून ब्र काढला तर ऐकून घेणार नाही. यांनी काहीही टीका करायची आणि उदयनराजेंनी ऐकून घ्यायची असं चालणार नाही अशी तंबीच यावेळी उदयनराजेंनी दिली.

महाशिवआघाडी या शब्दावरूनही शिवसेनेवर उदयनराजे यांनी टीकास्त्र सोडले. महाशिवआघाडीतून शिव शब्द का काढला? असा सवाल करत सोयीप्रमाणे शिवरायांचा वापर करता असा आरोप उदयनराजेंनी सेनेवर केला. 

गेल्या जन्मात सर्वांपेक्षा मुंगीएवढे जास्त पुण्य केले म्हणून या घराण्यात माझा जन्म झाला. आपण कधीही महाराजांचे वंशज म्हणून कधीही दुरुपयोग केला नाही. कधीही मिरवलो नाही. सत्तेच्या मागे कुत्र्यासारखं धावलो नाही, असे सांगत उदयनराजेंनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं. शिवसेनेने नाव बदलून ठाकरेसेना करावं. नाव बदलल्यानंतर राज्यातील किती तरुण तुमच्यासोबत राहतात हे मला पहायचं आहे असे आव्हान यावेळी उदयनराजेंनी दिले.

 "