Fri, Sep 25, 2020 14:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंकजा मुंडेंच्‍या गैरहजेरीवर चंद्रकांत पाटील म्हणाले...

पंकजा मुंडेंच्‍या गैरहजेरीवर चंद्रकांत पाटील म्हणाले...

Last Updated: Dec 10 2019 10:07AM

चंद्रकांत पाटील व पंकजा मुंडेमुंबई : पुढारी ऑनलाईन

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या सोमवारी औरंगाबाद येथे झालेल्या पक्षाच्या विभागीय बैठकीस गैरहजर राहिल्या होत्‍या. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या बैठकीला आल्या नसल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पंकजा मुंडे यांनी या पुर्वीच बैठकीला येऊ शकणार नसल्याचे सांगत परवानगीही घेतली होती, असेही पाटील यांनी माध्यमांना सांगितले आहे.

पंकजा मुंडे बैठकीला न आल्याचे सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, बैठकीसाठी औरंगाबादला येण्यापूर्वी पंकजा मुंडे यांच्याशी बोलणे झाले होते. त्या आजारी आहेत. त्याचबरोबर १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या मेळाव्याची तयारी सुरु आहे. पूर्वपरवानगी घेऊनच त्या अनुपस्थित राहिल्या आहेत. दोन दिवसांनंतर परळी येथे जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

यासोबतच भाजपच्या कोअर कमिटीची आज (ता.१०) मुंबईत बैठक होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही  बैठक होणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा होणार आहे. त्‍यामुळे आजच्‍या बैठकीला पंकजा मुंडे या उपस्‍थितीत राहणार का याकडे सर्वांवे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर केलेली भावनिक पोस्ट आणि ट्विटरवर बदललेले प्रोफाइल या सर्व गोष्टीमुळे राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची अटकळ बांधण्यात आली होती. भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनतर पंकजा यांनी खुद्द मी भाजप पक्षाची एकनिष्ठ आहे आणि भाजपमध्ये राहणार असे स्पष्ट केले. असे असले तरी औरंगाबादमधील बैठकीला पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 
 

 "