Sun, Jul 05, 2020 03:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप सोडणार नाही, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण

भाजप सोडणार नाही, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण

Last Updated: Dec 03 2019 7:06PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मी भाजप सोडणार असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत. मी पक्षाची सच्ची कार्यकर्ती आहे. मी पक्ष सोडणार नाही. मी पक्षावर दबाव आणण्यासाठीही फेसबुक पोस्ट केली नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या बंडाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. 

पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर आपल्या समर्थकांना भावनिक पोस्ट लिहून 12 डिसेंबरला बदलत्या  राजकीय संदर्भात निर्णय घेण्याचे सूतोवाच केले होते. त्यांच्या या पोस्टवरून भाजपमध्ये खळबळ उडाली होती. त्यांच्या या पोस्टवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे अनेक नेते संपर्कात असल्याचे सांगत पंकजा मुंडे या 12 तारखेला काय निर्णय घेतात ते पाहा, असे सांगत संभ्रमात भर घातली. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली असून, पंकजा मुंडे यांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेत्यांनी त्यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर हजेरी लावली. 

माजी मंत्री विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. बबनराव लोणीकर हेदेखील पंकजा मुंडे यांना भेटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याशी चर्चा करून त्यांना जेवणाचे आमंत्रण दिल्याचीही चर्चा आहे. भाजप नेत्यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे यांनी पक्ष सोडणार नाही. मी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. 

विनोद तावडे म्हणाले, पंकजा मुंडे या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर होणार्‍या मेळाव्याच्या निमित्ताने दरवर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या चाहत्यांसाठी पोस्ट टाकत असतात. मात्र, त्यांच्या या पोस्टचा विरोधकांनी विपर्यास केला. त्यामुळे पंकजा मुंडे व्यथित झाल्या आहेत. त्यांची पक्षाबद्दल कोणतीही नाराजी नाही. त्या पक्षाच्या नेत्या असून, 12 डिसेंबरला योग्य तो संदेश गोपीनाथ गडावरून देतील. राम शिंदे यांनीही पंकजा मुंडे या भाजपच्या प्रमुख नेत्या असून, त्या पक्षात राहतील, असे सांगितले. 

परळी विधानसभेत झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यातच ध्यानी-मनी नसताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सत्ता स्थापन केली. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक चुलत भाऊ धनंजय मुंडे हे मंत्री होऊ शकतात. त्यामुळे पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांत अस्वस्थता आहे.