Mon, Aug 10, 2020 08:21



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरेगाव भीमा प्रकरण : वरवरा राव रुग्णालयात दाखल

कोरेगाव भीमा प्रकरण : वरवरा राव रुग्णालयात दाखल

Last Updated: Jul 14 2020 11:27AM

जेष्ठ कवी वरवरा राव



मुंबई : पुढारी ऑनलाईन

कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले जेष्ठ कवी वरवरा राव यांना काल रात्री मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना चक्‍कर येत असल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. त्यांच्या काही चाचण्या केल्या जाणार असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले आहे. 

वरवरा राव यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अत्यावश्यक सोयी असलेल्या रुग्णालयात भरती करण्यात यावे, अशी मागणी राव यांच्या कुटुंबियांनी केंद्र तसेच राज्य सरकारकडे केली आहे. 

राव यांच्या पत्नी पी. हेमलता यांनी म्हटले आहे की, वरवरा राव गेल्या दोन महिन्यांपासून आजारी असून, त्यांच्यावर कारागृहातील रुग्णालयातच उपचार करण्यात येत आहेत. कारागृहात करण्यात येणारा उपचार पुरेसा नसून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. राव यांना साधं बोलतासुद्धा येत नाही. कारागृहात आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यात यावे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मदत करावी. कारागृह हे राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्याने त्यांनी विशेष लक्ष घालावे. आत्तापर्यंत राव यांचा जामीन अर्ज ५ वेळा फेटाळण्यात आला आहे. त्यांचे वय, तब्येत व कोरोनाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा त्यांच्या जामीन अर्जावर दुर्लक्ष करण्यात आले आहे. सध्या जामीनाचा विचार न करता जे. जे. रुग्णालयासारख्या चांगल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार व्हावेत. सरकारच्या निष्काळजीपणामुळे राव यांचा मृत्यू होऊ नये, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.