Thu, Sep 24, 2020 10:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात काही ठिकाणी बंदवेळी हिंसाचार

राज्यात काही ठिकाणी बंदवेळी हिंसाचार

Last Updated: Jan 30 2020 1:34AM
कोल्हापूर / मुंबई / धुळे / नागपूर : पुढारी वृत्तसेवा
बहुजन क्रांती मोर्चातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमविरोधात बुधवारी भारत बंदची हाक दिली होती. राज्यात काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. औरंगाबाद, सांगली, धुळे, भुसावळ, यवतमाळ, अकोला आदी ठिकाणी हिंसक घटना घडल्या. रस्त्यावर उतरून आंदोलकांनी सीएए व एनआरसीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. डीएनए आधारित एनआरसी करा, सीएए हटवा, ईव्हीएम बंद करा व देश वाचवा या प्रमुख मागण्या भारत बंद आंदोलनात करण्यात आल्या.

मुंबईमध्ये काही आंदोलक हे रेल रोको करण्यासाठी ट्रॅकवर उतरले होते. कांजूरमार्ग स्थानकाजवळ बहुजन क्रांती मोर्चाने रेल रोको केला. या रेल रोकोचा फटका मध्य रेल्वेला बसला असून वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलकांना पोलिसांनी ट्रॅकवरून हटवले आणि ताब्यात घेतले.

यवतमाळला आंदोलकांवर मिरची पावडर
यवतमाळमधील मारवाडी चौकात आंदोलनाला गालबोट लागले. काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी लाठीचार्ज केला. दहा जणांना ताब्यात घेतले आहे. बंदवेळी मारवाडी चौकात व्यापारी आणि आंदोलक समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलकांकडून बळजबरीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न झाला. दुकानातील साहित्याची नासधूस करण्यात आली. संतापलेल्या एका व्यापार्‍याने आंदोलकांवर मिरची पावडर भिरकावली. आंदोलक एका विशिष्ट समुदायाचे असल्याने या प्रकारानंतर यवतमाळमध्ये जातीय तणाव निर्माण झाला. यवतमाळमध्ये पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे.

धुळ्यात जाळपोळ
धुळ्यातील 100 फुटी रोडवर जमावाने दगडफेक केली. जाळपोळ केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. आंदोलकांशी झालेल्या झटापटीत 2 पोलिस अधिकारी आणि 10 पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. आंदोलकांनी दोन एसटी बसची तोडफोड केली. 2 मोटारसायकली जाळल्या. चाळीसगाव रोडलगत असलेल्या शंभर फुटी रस्त्यावर मोठा जमाव गोळा झाला. या जमावाने घोषणाबाजी करीत रस्त्यावर आंदोलन केले. काही वेळातच हा जमाव हिंसक झाला. या चौफुलीजवळ असलेल्या पोलिस चौकीवर हा जमाव चालून गेला. तसेच दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दरम्यान अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील घटनास्थळी पोहोचले. यावेळी जमावाने चौफुलीवर दुकान व गॅरेजबाहेर लागलेल्या गाड्यांवर तुफान दगडफेक केली. जमावाने दोन दुचाकी व एक कार जाळली. जमावाने 12 ते 15 कारच्या काचा फोडल्या. पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांच्या गाडीभोवती देखील जमावाने धिंगाणा घातला. अखेर या भागात बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाच्या तुकडीस पाचारण करण्यात आले. शहरात भीतीचे वातावरण आहे.

भुसावळला चार पोलिस जखमी
बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनांच्या भारत बंद दरम्यान भुसावळात दोन ठिकाणी दगडफेक झाली. दगडफेकीत चार पोलिस आणि तीन नागरिक किरकोळ जखमी झाले.

शहरात सकाळी सुरुवातीस बाजारपेठ बंद करण्यात आली. शनी मंदिर वॉर्डाकडून दुकाने बंद करण्यासाठी आलेल्या जमावाला पोलिसांनी काझी प्लॉटजवळ अडविले. याप्रसंगी काही समाजकंटकांनी दुकानांवर दगडफेक केली. नंतर हा जमाव राजा टॉवर चौकातून मॉडर्न रोडच्या दिशेने वळला. यावेळी जमावाने मॉडर्न रोडवरील हॉटेल आर्य निवासवर दगडफेक केली. शहरात भीतीचे वातावरण व अफवांचे पेव पसरले होते. दगडफेकीच्या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी शहरात भेट देऊन पाहणी केली. राष्ट्रीय महामार्गावरील खडका चौफुलीवर जमावाने रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला.

औरंगाबादमध्ये पोलिसांना मारहाण
एसटी बस अडविणार्‍या जमावाने सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल यांना मारहाण केल्याची घटना दिल्ली गेट येथे घडली. यावेळी जमावाने पोलिसांचा व्हिडीओ कॅमेरासुद्धा फोडला. दुपारी एक ते सव्वाच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेरगावी निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला जमावाने अडविले. पोलिसांशी जमावाने अरेरावी केली. या घटनेचे चित्रीकरण करणार्‍या पोलिस कर्मचारी संतोष जोशी आणि संजय भोटकर यांना मारहाण करण्यात आली.

बाळापुरात दगडफेक; पोलिसांचा लाठीचार्ज
‘भारत बंद’ला बुधवारी पातुर, बाळापुरात (अकोला) हिंसक वळण लागले. रास्ता रोको दरम्यान काही आंदोलकांनी दगडफेक केली. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या. एका रेस्टॉरंटचेही नुकसान झाले. अकोला येथूनही पोलिसांची अतिरिक्‍त कुमक बोलावण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी अमोल इंगळे, यासीन खान यांच्यासह दहा जणांना ताब्यात घेतले आहे. 

मिरजेमध्ये रिक्षांची तोडफोड
मिरजेमध्ये कॅन्सर हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर तरुणांनी जबरदस्तीने रिक्षा वाहतूक बंद केली. तसेच काही रिक्षांची तोडफोडही केली. यामुळे या परिसरात गोंधळ निर्माण झाला. जबरदस्तीने बंद करून तोडफोड करणार्‍या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 "