Fri, Sep 25, 2020 16:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुडविन ज्वेलर्सच्या मालकांना बेड्या

गुडविन ज्वेलर्सच्या मालकांना बेड्या

Last Updated: Dec 14 2019 1:51AM
ठाणे : प्रतिनिधी
गुंतवणुकीवर व्याजाचे आमिष दाखवून तब्बल 1154 गुंतवणूकदारांची 25 कोटी रुपयांची फसवणूक करून रातोरात आपल्या शोरूमला टाळे लावून फरार झालेल्या गुडविन ज्वेलर्सच्या दोघा मालकांना अखेर ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी बेड्या ठोकल्या. सुनीलकुमार मोहनन अकराकरण आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण (राहणार- पलावा सिटी, डोंबिवली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून दोघेही सख्खे भाऊ आहेत. गुडविन ज्वेलर्सची ठाणे, डोंबिवलीत तीन शोरूम्स आहेत. फसवणूकप्रकरणी डोंबिवली, ठाणे आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यासह एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोघा फरार अकराकरण बंधूंचा ठाणे पोलीस गेले दोन महिने शोध घेत होते. 

डोंबिवलीत मुख्यालय असलेल्या गुडविन ज्वेलर्सने भिशी योजना, फिक्स डिपॉझिट अशा अनेक गुंतवणुकीच्या योजना सुरू केल्या होत्या. या योजनांमध्ये हजारो गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, ऐन दिवाळीत गुडविन ज्वेलर्सचे मालक त्यांचे तीनही शोरूम्स बंद करून फरार झाल्याने हजारो गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. या प्रकरणी डोंबिवलीतील रामनगर, ठाण्यातल्या नौपाडा आणि उल्हासनगरातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर फसवणूक झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी आपले पैसे परत मिळावेत म्हणून आंदोलने देखील केली होती.

त्यानंतर या घटनेचा तपास ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठाणे आणि डोंबिवलीतील शोरूम उघडून त्यातील ऐवज जप्त करण्याची कारवाई देखील केली होती. मात्र ज्वेलर्सचे मालक असलेले अकराकरण बंधू सगळा ऐवज घेऊन फरार झाल्याने या शोरुम्स मध्ये फर्निचर ऐवजी काहीही पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यामुळे गेली दोन महिने पोलीस गुडविन ज्वेलर्सच्या दोघा मालकांचा शोध घेत होते. दरम्यान, शुक्रवारी दोघेही बंधू ठाणे कोर्टात येणार असल्याची ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सकाळपासूनच कोर्ट परिसरात दबा धरून बसलेल्या गुन्हे व आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोघा सुनीलकुमार आणि सुधीरकुमार या दोघा बंधूंना ताब्यात घेतले. दोघा आरोपींना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी दिली. 

काय आहे प्रकरण
सोने, चांदी आणि हिरे खरेदी विक्री करणारे गुडविन ज्वेलर्सचे डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगर असे तीन ठिकाणी शोरूम्स आहेत. मोठमोठ्या सिनेस्टार मंडळींना आपला ब्रँड अँबेसिडर घेऊन गुडविन ज्वेलर्सच्या मालकांनी अनेक गुंतवणुकीच्या योजना बनवल्या होत्या. मोठा थाटमाट आणि ग्लॅमरचा देखावा यामुळे हजारो गुंतवणूकदारांनी लाखोंची गुंतवणूक गुडविन ज्वेलर्स मध्ये केली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा आणि व्याज मिळत नव्हते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा तगादा मालकांच्या मागे लागला होता.

दरम्यान, गुडविनचे मालक असलेले सुनीलकुमार आणि सुधीरकुमार हे दोघेही बंधू ऐन दिवाळीच्या धामधुमीत आपले तीनही शोरुम्स बंद करून परिवारासहित फरार झाले होते. त्यांच्या फरार होण्याची खबर बाहेर येताच गुडविन ज्वेलर्स समोर गुंतवणूकदारांचा जमाव जमा होऊ लागला. अखेर या घटनेप्रकरणी 21 ऑक्टोबर रोजी डोंबिवली पोलीस ठाण्यात पहिला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस तपासात एकूण 1154 गुंतवणूकदारांची तब्बल 25 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. तर पोलिसांनी गुडविनचे तीनही शोरुम्स देखील सील केले.

एकीकडे पोलीस कारवाईचा फास आवळत असतांना दोघेही फरार अकराकरण बंधू पोलिसांना चकवा देत होते. या दरम्यान या दोन्ही बंधूंनी आपला व्हीडिओ जारी करून आपण कुणाचीही फसवणूक केली नसल्याचे सांगितले होते. त्यांचे मूळ गाव असलेल्या केरळातील त्रिशूर जिल्ह्यात ठाणे पोलिसांचे दोन पथक गेली दोन महिने तळ ठोकून होते. परंतु तरी देखील पोलिसांना यश मिळत नव्हते. अखेर पोलिसांनी दोघा आरोपीचे चालक, नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन माहिती मिळवणे सुरू केले. याच दरम्यान दोघेही आरोपी शुक्रवारी ठाणे कोर्टात शरण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी दोघांवर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले.

बंगले, फार्महाऊस, मर्सडीज जप्त
गुडविन ज्वेलर्सचे दोघेही मालक आपल्या परिवारासह फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचे तीन शोरुम्स, डोंबिवलीतल्या पलावा सिटीतले फ्लॅट, बंगले, फार्महाऊस, शेतजमीन, मर्सडीज व फॉर्च्युनर कार, म्युचल फंड, शेअर्स, बँक खाते अशी मालमत्ता गोठवली होती. तर तीनही शोरुम्स उघडून त्यातील मालमता जप्तीची कारवाई केली होती. मात्र या शोरुम्स मधील सर्व दागिने व ऐवज घेऊन मालक फरार झाल्याने पोलिसांना फक्त फर्निचर आढळून आले होते.

 "