Wed, Apr 01, 2020 11:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवार आज राज्यातील जनतेशी 'मन की बात' करणार

शरद पवार आज राज्यातील जनतेशी 'मन की बात' करणार

Last Updated: Mar 27 2020 9:24AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यात कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. त्यामुळे राज्यासमोर गंभीर संकट उभा राहत चालले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यांच्या फेसबुक पोस्टवरून ही माहिती देण्यात आली आहे. 

त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील जनतेसमोर उभ्या ठाकलेल्या महाभयानक आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा, आर्थिक संकट, कृषी उत्पन्न, कायदा व सुव्यवस्था, कामगारांच्या समस्या अशा अनेक आव्हानांबाबत माझ्या फेसबुक पेजवरून शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२० रोजी सकाळी ११ वाजता आपल्याशी संवाद साधणार आहे.

दरम्यान, मुंबई पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात गुरुवारी झालेल्या चाचण्यांमध्ये पंधरा रुग्ण ‘कोरोना पॉझेटिव्ह’ आढळले असून, त्यात तब्बल नऊ जण मुंबईचे तर सहा जण ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई आणि पुणे शहरातील आहेत. यातील मुंबईचे सात जण रुग्णांच्या संपर्कात आले तर उर्वरित आठ जण परदेशातून हा आजार घेऊन आल्याचे पालिका आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

महामुंबईत कोरोनाबाधितांची संख्या आता 80 वर पोहोचली असून, सिंधुदुर्गातील नव्या रुग्णाचा समावेश करता महाराष्ट्रातील रुग्ण संख्या 139 झाली आहे. कस्तुरबा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये गुरुवारी
429 जणांची तपासणी केली. यात 124 कोरोना संशयित आढळले. त्यांची तपासणी केली असता मुंबईतील नऊ जण आणि ठाणे शहरातील 2, नवी मुंबईतील 2, डोंबिवलीमधील एक आणि पुणे येथील एक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. परिणामी कोरोनाबाधितांची संख्या महामुंबईत 80 वर पोहोचली आहे. दरम्यान, पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात एकूण 223 जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दुपारी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे आणखी 8 नविन रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोनाची बाधितांची संख्या आता 130 झाली होती.
मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला. सांगलीत 3 तर पुणे आणि कोल्हापूर येथेही प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याचे त्यांनी म्हटले होते. राज्याच्या आरोग्य विभागाने मुंबईत 49 रुग्ण
असल्याचे सांगितले असले तरी मुंबई महापालिकेने खुद्द मुंबईत 52 तर मुंबईबाहेरील मिळून महामुंबईत एकूण 77 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितल्याने बांधितांचा आकडा हा 130 पेक्षाही अधिक असल्याच स्पष्ट झाले आहे.