Tue, Mar 09, 2021 16:39
अन् अजिंक्य रहाणेने वर्णद्वेषी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचीही मने जिंकली

Last Updated: Jan 19 2021 4:37PM
ब्रिस्बेन : पुढारी ऑनलाइन 

टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला तीन गडी राखून पराभवाची धूळ चारली. या रोमहर्षक विजयाबरोबर टीम इंडियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेवर २-१ अशा फरकाने कब्जा केला. सलामीवीर शुभमन गील, मधल्याफळीतील चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने विजयाला गवसणी घातली. 

दरम्यान, बदली कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या संयमी आणि आश्वासक नेतृत्वाचे सर्वच स्तरातून तोंडभरून कौतुक होत आहे. त्याचबरोबर अजिंक्यने ऑस्ट्रेलियन खेळाडूंचेही मन जिंकले आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लायनने ब्रिस्बेन मैदानावर आपल्या कसोटी करिअरमधील १०० वा सामना खेळला. नाथनच्या या कामगिरीबद्दल टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य राहाणे याने त्याचा सत्कार केला. सामना झाल्यांनतर अजिंक्यने पत्रकार परिषदेदरम्यान नाथनला बोलावले व त्याला टीम इंडियाची जर्सी देऊन गौरविण्यात आले. अजिंक्यच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर ऑस्ट्रेलियन नागरिकांनी वर्णद्वेषी शेरे मारले होते. मात्र, अजिंक्य रहाणेने प्रतिस्पर्ध्यांना प्रेमाने उत्तर दिले आहे. 

भेट देण्यात आलेल्या टीम इंडियाच्या जर्सीवर सर्व भारतीय खेळाडूंच्या स्वाक्ष-या आहेत. या जिगरबाज कृतीमुळे भारतीय खेळाडूंनी क्रिकेट चाहत्यांची मनेही जिंकली आहेत. अनेकांकडून ट्विटद्वारे भारतीय संघाचे कौतुक होत आहे.