Sat, Oct 24, 2020 08:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिलांचा लोकल प्रवास दोन दिवसांत

महिलांचा लोकल प्रवास दोन दिवसांत

Last Updated: Oct 19 2020 1:34AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

महिलांच्या लोकल प्रवासाबाबत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यातील चर्चेत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. रविवारी दिवसभर झालेल्या या चर्चेत राज्य सरकारकडून महिलांच्या प्रवासाबाबत कार्यपद्धती ठरविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लोकल प्रवासाकरिता महिलांना आणखी दोन दिवसांची वाट पहावी लागणार आहे.

राज्य सरकारने 17 ऑक्टोबरपासून मुंबई महानगरातील सर्वच महिलांना क्यूआर कोड ई-पासशिवाय तिकीटाच्या आधारे लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी रेल्वेकडे केली होती. राज्य सरकारने सकाळी 11 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 7 ते शेवटच्या लोकलपर्यत महिलांना  प्रवासाची मुभा देण्यात यावी असे पत्रात नमुद केले होते. परंतु यामुळे किती प्रवासी वाढतील, त्या प्रवासी संख्येला सामावुन घेण्यासाठी किती लोकल वाढवाव्या लागतील तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन व्हावे याकरिता नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे सोबत चर्चा करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाने पत्राद्वारे राज्य सरकारकडे केली होती. त्यामुळे महिलांना शनिवारपासुन तात्काळ लोकल प्रवास देण्यास रेल्वेने असमर्थता दर्शविली होती.

त्यानुसार शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनात बैठका आणि चर्चा सत्र सुरु आहे. रविवारी झालेल्या चर्चेत खासगी क्षेत्रातील महिलासह इतर प्रवाशांच्या अंदाजानुसार नियोजन करणे गरजेचे असल्याचे रेल्वेकडून राज्य सरकारला सांगण्यात आले. दिवसभर सुरु असलेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने विशिष्ट कार्यपद्धती ठरवण्याचे निश्चित केले असून त्यावर लवकरच रेल्वेला त्याबद्दल माहिती दिली जाणार आहे. क्यूआर कोडशिवाय नुसत्या तिकिटावर ईतर महिलांना प्रवासाची मुभा दिली तर अत्यावश्यक सेवेतील महिला प्रवाशांना दिलेल्या ई-पासचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. 

 "