Wed, Apr 01, 2020 23:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : आयुक्तांच्या वादग्रस्त विधानाचा महिला नगरसेवकांकडून निषेध 

ठाणे : आयुक्तांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध 

Last Updated: Feb 20 2020 3:12PM

संग्रहित फोटोठाणे : पुढारी वृत्तसेवा 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अधिकाऱ्यांवरील वादग्रस्त टीकेचे पडसाद आज झालेल्या सर्वसाधारण सभेतही उमटले.अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयातील महिला सदस्यांबाबत पालिका आयुक्तांनी अपशब्दांचा वापर केल्याने महिला नगरसेविका कमालीच्या संतप्त झाल्या. तसेच अशा प्रकारे महिल्यांच्या संदर्भात अपशब्द वापरणाऱ्या आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी महिला नगरसेविकांनी यावेळी केली. 

विशेष म्हणजे पालिका सचिव अशोक बुरपुल्ले यांनी या वृत्ताला सभागृहात दुजोरा दिला. त्यानंतर नगरसेवकांच्या भावनांचा विचार करत महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत अर्ध्या तासांसाठी सभा तहकूब केली. 

आज झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी पालिका आयुक्तांच्या वादग्रस्त विधानाचा मुद्दा उपास्थित केला. तसेच त्या वादग्रस्त विधानाचा जो संदेश व्हायरल झाला तो नेमका काय आहे? हे सभागृहाला समजलेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तर ज्या ग्रुपवर महिला अधिकारी आहेत त्या ग्रुपवर एखाद्या अधिकाऱ्यांच्या आई- बहिणीविषयी अशा प्रकारे वादग्रस्त विधान करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकारचा निषेध केला. 

तसेच ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी देखील या प्रकारचा निषेध करत ३५ वर्षांमध्ये अशाप्रकारे वयक्तिक स्वरूपाची टीका झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी देखील या सर्व प्रकारचा खुलासा करावा अशी मागणी सभागृहात केल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी पालिकेचे सचिव अशोक बुरपुल्ले यांना सभागृहात असा काही प्रकार झाला आहे का? याचा खुलासा करण्याचे आदेश दिले.

महापौर म्हस्के यांच्या आदेश प्रमाणे तपास केल्यानंतर पालिका सचिवांनी असा प्रकार झाल्याचे सांगत त्याला दुजोरा दिला. तसेच पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या महिला कुटूंबियांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्याचीही कबुली त्यांनी दिली. अखेर महापौर म्हस्के यांनी महिला नगरसेवकांच्या भावना लक्षात घेऊन सर्वसाधारण सभा अर्ध्या तासांसाठी तहकूब केली.