राठोड, मुंडे, मोफत विजेच्या मुद्द्यावर सरकारला घेरणार

Last Updated: Feb 28 2021 1:40AM
Responsive image
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्य विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात  विरोधकांनी वनमंत्री संजय राठोड आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणासह मोफत वीज देण्याबाबत सरकारने कोणताही प्रस्ताव न आखल्याने याप्रकरणीही सरकारला धारेवर धरण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार आहे.

धनंजय मुंडे यांचे सहमतीचे प्रकरण असल्यामुळे राज्यातील जनतेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. करुणा शर्मा आणि त्यांच्या भगिनींनी अनेकांना ब्लॅकमेल केल्याचे उघड झाल्यामुळे  या नाजूक प्रकरणावर पडदा पडला आहे. मात्र बीडमधील पूजा चव्हाण प्रकरणी अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई केली नसल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला असला तरी राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्वसामान्य ग्राहकांना मोफत वीज देण्याचा घोषणा केली. मात्र, त्याची अद्याप पूर्तता झाली नाही. कोरोनाच्या काळातील वाढीव वीजबिल, शेतकर्‍यांची कर्जमाफी, मराठा आरक्षण आदी मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार आहेत.

राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाणार आहे. कोरोना संकटात कोव्हिड सेंटरमधील कारभाराचा मुद्दा विरोधकांकडून लावून धरला जाणार असल्याची माहिती भाजपच्या एका नेत्याने दिली.