Wed, Aug 12, 2020 09:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पूरस्थिती का चिघळली; चौकशी करा : हायकोर्ट

पूरस्थिती का चिघळली; चौकशी करा : हायकोर्ट

Published On: Sep 12 2019 1:51AM | Last Updated: Sep 12 2019 1:17AM
मुंबई : प्रतिनिधी

पूरस्थिती प्रशासकीय गलथानपणामुळे चिघळली की अन्य काही कारणांनी याची चौकशी राज्य शासनाने करावी.  नुकसान भरपाईबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकारही त्यांचाच आहे. त्यामुळे त्यांनीच काय ते ठरवावे, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने बुधवारी दिल्या.

कोल्हापूर,  सांगलीसह महाराष्ट्रात उद्भवलेला महापूर मानवनिर्मित होता.  प्रशासकीय गलथानपणा आणि  धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशाचे  उल्लंघन झाले, असा  आरोप करणार्‍या  याचिकेत करण्यात आला.

ही  जनहित याचिका राष्ट्रीय जन आंदोलनाच्या समन्वयाचे सदस्य रावसाहेब आलासे आणि पत्रकार राजेंद्र पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रीय जल संधारण विभाग यांनी निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने याचिका निकाली काढताना स्पष्ट केले.
कोयना व इतर धरणातील पाणी सोडताना  केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन झाले. कर्नाटक सरकारशी महाराष्ट्र  सरकारने योग्य समन्वय राखला नाही. त्यामुळे सांगली, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी महापुराची आपत्ती कोसळली, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता.