Fri, Oct 30, 2020 04:20



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनाविषयी अधिकृत माहितीसाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

कोरोनाविषयी अधिकृत माहितीसाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Last Updated: Mar 25 2020 10:04PM




मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाविषयक माहिती नागरिकांना अधिकृतरीत्या मिळावी, यासाठी राज्य शासनाने +912026127394 या क्रमांकाचा व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट ग्रुप सुरू केला आहे. याचाही लाभ नागरिक घेऊन माहिती घेऊ शकतात. त्यांच्या प्रश्‍नांची माहिती सध्या इंग्रजीत व कालांतराने इतर भाषांतही माहिती मिळणार आहे.

दरम्यान, पंतप्रधानांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे अजिबात घाबरून जाण्याचे व गोंधळण्याचे कारण नाही. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपल्या काळजीपोटी घेतलेला हा निर्णय आहे. राज्यात जीवनावश्यक वस्तू, अन्‍नधान्य, औषधे यांचा पुरेसा साठा असून नागरिकांनी काळजी करून अनावश्यकरीत्या दुकानांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

पंतप्रधानांच्या घोषणेने लोकांनी घाबरून जाऊन दुकानांमध्ये गर्दी केली. माझ्यापर्यंत या बातम्या पोहोचल्यावर मी स्वत: पंतप्रधानांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली की आम्ही महाराष्ट्र लॉकडाऊनची कालच घोषणा केली आहे, तसेच नागरिकांच्या सोयीसाठी जीवनावश्यक वस्तू मिळतील तसेच अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील अशी व्यवस्था केली आहे. पंतप्रधानांनी युरोपमध्ये परिस्थिती कशी भीषण बनत गेली यासंदर्भात माहिती दिली. आपल्या देशात असे होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले.

राज्यात जीवनावश्यक वस्तू, अन्‍नधान्य, औषधे, दूध, भाजीपाला या सर्वांचा व्यवस्थित पुरवठा होत राहील. या मालाची ने-आण करणारी वाहतूक सुरळीत सुरू राहील याची खात्री बाळगा, असे मुख्यमंत्री म्हणाले. परदेशातून आलेल्या प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाची संपूर्ण माहिती द्यावी. साथ पसरण्यास ते कारणीभूत ठरेल. त्यामुळे त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.





 







"