Wed, Sep 23, 2020 08:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत मंगळवारी कोरोना रुग्ण घट होण्यामागचे गौडबंगाल काय?

मुंबईत मंगळवारी कोरोना रुग्ण घट होण्यामागचे गौडबंगाल काय?

Last Updated: Aug 08 2020 12:33AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मागील महिनाभरापासून दर मंगळवारी कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी असल्याचे दिसून येते. दर मंगळवारी रुग्णांची आकडेवारी कमी का होते, यामागचे गौडबंगाल मात्र अद्यापपर्यंत समजलेले नाही. पण रुग्ण संख्या कमी होत असल्याचे सांगत, पालिका प्रशासन आपली पाठ कौतुकाने थोपटवत आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर एक टक्के पेक्षा कमी झाल्याचा दावा, मुंबई पालिकेकडून केला जात आहे. तरीही मुंबईत दररोज एक हजारावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. गेल्या महिनाभरापासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत एक चमत्कार होत असल्याचे दिसून येत आहे. महिनाभराची आकडेवारी काढली तर, फक्त मंगळवारी आठवड्याच्या अन्य दिवसांपेक्षा रुग्ण संख्या कमी असल्याचे दिसून आले आहे.

उदाहरणार्थ सोमवार 27 जुलैला 1 हजार 33 रुग्णांची नोंद झाली होती. तर बुधवार 29 जुलैला 1 हजार 118 रुग्णांची नोंद झाली होती.  मंगळवारी 28 जुलैला अवघ्या 717 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पालिका प्रशासनाने मंगळवारची आकडेवारी डोळ्यासमोर ठेवून मुंबईत रूग्ण संख्येत घट झाल्याचा दावा केला. त्यानंतर येणार्या प्रत्येक मंगळवारी कोरोना रुग्णांची कमी नोंद होत असल्याचे पालिकेच्या अहवालावरून दिसून आले. मंगळवार 4 ऑगस्टला ही अवघ्या 709 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. मात्र दुसर्‍या दिवशी बुधवार 5 ऑगस्टला कोरोना रुग्णांची संख्या सुमारे 418 ने वाढली. या दिवशी तब्बल 1 हजार 125 कोरोना रुग्ण आढळून आले.

आठवड्याच्या अन्य दिवशी कोरोना रुग्णांची संख्या एक हजारपेक्षा जास्त असताना, नेमकी मंगळवारीच रुग्णांची संख्या कमी का होत आहे. याबाबत पालिका काही बोलण्यास तयार नाही. मात्र रुग्ण संख्या कमी झाल्याचा दावा करत आहे. विशेष म्हणजे याचा आधार घेत रुग्ण संख्या कमी झाल्याचा दावा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनीही केला आहे. त्यामुळे खरे काय आणि खोटे काय? हे पालिकेने जनतेसमोर आणावे, इतकीच माफक इच्छा मुंबईकरांची आहे.

पालिका मात्र रुग्ण संख्या घटल्यामुळे खुशीत

मंगळवारची कोरोना रुग्ण आकडेवारी

4 ऑगस्ट          709

28 जुले            717

21 जुलै            995

14 जुलै            969

7  जुलै             806

30 जून            903
 

 "