Wed, Jan 20, 2021 09:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मतदान करा, घसघशीत सवलत मिळवा

मतदान करा, घसघशीत सवलत मिळवा

Last Updated: Oct 21 2019 12:49AM
मुंबई: खास प्रतिनीधी

मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राजकीय पक्षांनी देव पाण्यात घातले असताना आणि निवडणूक आयोगाकडून जाहीरातींचा मारा होत असताना लोकांनी आपला हक्क बजावावा यासाठी आता हॉटेल व्यावसायिक, विविध सामाजिक संस्थांनीही मतदारांना अनेक ऑफर्स दिल्या आहेत. मतदान करणार्‍यास घसघशीत सवलती  देण्याबरोबरच बक्षिसेही दिली जाणार आहेत. सध्याच्या मंदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी हा फंडा आणला आहे.  

येवल्याच्या प्रसिध्द कापसे पैठणी कडून उद्या मतदान करून पैठणी खरेदीसाठी येणार्‍यांना 15 टक्के सूट दिली जाणार आहे. ही सवलत  21 ते 24  तारखेपर्यंत म्हणजे मतमोजणीच्या दिवसापर्यंत ठेवण्यात आली आहे.

कोल्हापुरच्या लक्ष्मी मिसळच्या मालकांनी मतदान केल्याची शाई दाखणार्‍यास मिसळीच्या दरात 10 टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे. मतदान करून पेंचच्या अभयारण्यात सहलीसाठी जाणार्‍यांना नागपूर जिल्हा प्रशासनाकडून तेथील रिसॉर्ट-हॉटेल्समध्ये सूट देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, 10 ते 25 टक्क्यांपर्यंतच्या या सवलतीसाठी बोटावरची शाई दाखवावी लागेल, असे नागपूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. 

नाशिकमधील सेवाभावी संस्था प्रयत्न करीत असताना व्यावसायिकांकडूनही मतदान करणार्‍यांना टीव्हीपासून अन्य भेटवस्तू तसेच वैद्यकीय चाचण्या आणि कपडे खरेदीत सवलती देऊ केल्या आहेत. पंचवटीतील एका व्यावसायिकाने मतदान केल्यानंतर त्यांच्या दुकानात नाव नोंदवणार्‍या मतदारांची सोडत काढून भाग्यवान मतदाराला टीव्ही संच भेट देण्याचे जाहीर केले आहे. देवळा आणि लोहोणेरमधील एका पतसंस्थेच्या वतीने मतदानानंतर नाव नोंदविणा-या शंभर भाग्यवान मतदारांना बक्षिसे दिली जाणार आहेत. नाशिक शहरातील एका टेलरने तर मतदान केल्याची खूण दाखविल्यास ग्राहकाला शिलाई त्याचप्रमाणे ड्रेस मटेरियल, रेडिमेड कपडे यावर 50 टक्क्यांपर्यंत सुट देण्याचे जाहीर केले आहे. पॅथॉलॉजिकल लॅबकडून तर मतदान करणार्‍यास कोणत्याही प्रकाराच्या आरोग्य तपासणीवर तब्बल 40 टक्के सूट दिली जाणार असून एका आइस्क्रिम पार्लरने कोणत्याही प्रकारच्या आइस्क्रिमवर तीस टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे.