Fri, Sep 18, 2020 22:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ वाढवावा : विजय वडेट्टीवार

'सरकारने पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ वाढवावा'

Published On: Aug 14 2019 2:52PM | Last Updated: Aug 14 2019 2:52PM

संग्रहित छायाचित्र  मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील पूरग्रस्त भागात झालेले नुकसान पाहता १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. केंद्र सरकारकडे ६ हजार कोटी रुपयांची मागणी केलेली असली तरी केंद्र सरकारची मदत मिळण्यास वेळ लागतो हे लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने मदतीचा ओघ वाढवावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

पूरासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, पूरग्रस्त भागात शेतीची अपरिमित हानी झालेली आहे. ऊस, केळी, भाजीपाला, सोयाबीन, मका या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. पशुधनाची या पुरात वाताहात झालेली आहे. सरकारने पशुधनासाठी जाहीर केलेली ३० हजार रुपयांची मदत अपुरी असून पशुधनच द्यावे. या भागातील शेतकऱ्यांची सर्व थकित कर्ज माफ करुन नवे कर्ज उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. पुरात झालेल्या घरांची पुनर्बांधणी करावी, छोट्या दुकानदारांनाही तातडीने आर्थिक मदत करावी तसेच पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचा जीएसटी माफ करावा, विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्कही माफ करावे.

महाराष्ट्रावर एवढी मोठी आपत्ती ओढवलेली असताना केंद्र सरकारने त्याची अजून गंभीर दखल घेतलेली नाही. शेजारच्या कर्नाटकमध्ये दोन-दोन केंद्रीय मंत्री येऊन पाहणी करुन गेले पण महाराष्ट्रातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांनी वेळ दिला नाही. केंद्र सरकारमध्ये राज्यातील आठ मंत्री आहेत. त्यांनी या संकटावेळी महाराष्ट्रासाठी भरीव आर्थिक मदत आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण त्यांच्याकडून प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. महापुरातून जनता अजून सावरलेली नसताना मुख्यमंत्र्यांना मात्र पुन्हा एकदा आपल्या प्रचार यात्रेची ओढ लागलेली दिसते. राज्य संकटात असताना प्रचाराचे वेध लागणे हा असंवेदनशीलपणाचा कळस आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.