Tue, Aug 11, 2020 21:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिग्गज काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांचा आज भाजप प्रवेश

दिग्गज काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांचा आज भाजप प्रवेश

Published On: Sep 11 2019 2:33AM | Last Updated: Sep 11 2019 2:32AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंह यांच्यासह काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आणि सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील हे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंह आणि आनंदराव पाटील हे मुंबईतील चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश घेतील तर राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री गणेश नाईक हे वाशी येथे नवी मुंबई महापालिकेतील 55 नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच भाजपमध्ये विलीन करणार आहेत.

बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून दिग्गज नेते बाहेर पडत असल्याने या दोन्ही पक्षांना जोरदार हादरा बसला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपमध्ये तिसरी मेगा भरती बुधवारी  होणार आहे. पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार नसल्याने नाराज हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर तोफ डागत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. त्याचवेळी ते भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर बुधवारी त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला.

माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसला आणखी एक जबर धक्का बसला आहे. कृपाशंकर सिंह यांचे मुंबई आणि परिसरातील उत्तर भारतीय मतदारांमध्ये वर्चस्व आहे. गेले काही महिने ते काँग्रेसमध्ये फारसे सक्रियही नव्हते. त्यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. त्यांनाही बुधवारी प्रवेश देण्यात येणार आहे. आमदार आनंदराव पाटील हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू मानले जात होते. मात्र, त्यांनी त्यांची साथ साडून भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला. सातारा जिल्ह्यात खासदार रणजित निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्यानंतर आनंदराव पाटील यांनीही काँग्रेसची साथ सोडल्याने जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. गरवारे क्लबमध्ये दुपारी हा प्रवेश सोहळा आयोजित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हे प्रवेश होणार आहेत. 

नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक हे देखील वाशी येथील एका समारंभात भाजपमध्ये सामील होणार आहेत. त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश घेतला आहेत. आता गणेश नाईक, त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 55 नगरसेवकांसह भाजपमध्ये येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. नाईक कुटुंब नगरसेवक आणि समर्थकांसह भाजपध्ये दाखल होत असल्याने गर्दी टाळण्यासाठी त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम स्वतंत्रपणे नवी मुंबईत घेण्यात आला आहे. नाईक यांच्या प्रवेशाने ठाण्यासह रायगड जिल्ह्यातही भाजपची ताकद वाढणार आहे.