मुंबई : पुढारी वृत्तसेवा
फ्रँक करण्याच्या नावाखाली अश्लिल व्हिडीओ तयार करुन ते युट्युब चॅनेल आणि फेसबुक अशा सोशल मिडीया फ्लॅटफार्मवर अपलोड करुन पैसे कमावणार्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने पर्दाफाश केला आहे. सायबर पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक करुन 17 यू ट्यूब चॅनेल आणि फेसबुक खात्यांवर कारवाई केली आहे.
मरीन लाईन्स, वांद्रे किल्ला, जुहू आणि आक्सा बीच, गोराई याठिकाणांसह मुंबईतील पालिकेच्या गार्डन्सचा वापर करत फ्रँक करण्याच्या नावाखाली अश्लिल व्हिडीओ तयार करुन ते यू ट्यूब चॅनेल आणि फेसबुक अशा सोशल मिडीया फ्लँटफार्मवर अपलोड केले जात असल्याची माहीती राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेकडे केली होती. याच आधारे सायबर शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस पथकाने तपास करत टोळीचा मोरक्या मुकेश गुप्ता (29) याच्यासह प्रिन्सकुमार साव (23) आणि जितेंद्र गुप्ता (25) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींजवळून 4 मोबाईल, 5 लॅपटॉप आणि कॅमेरा जप्त केला आहे.
फ्रँक करायचा आहे असे सांगून हे या मुलींना बोलावत होते. पॉकेट मनी, ईझी मनीसाठी मुली होकारसुद्धा द्यायच्या. त्यानंतर एखाद्या सार्वजनिक ठिकाणी या मुलींना नेत मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करण्यात येत होते. यावेळी मुलींना आक्षेपार्ह ठिकाणी हात लावणे, अश्लिल शब्द प्रयोगांचा वापर करणे, अश्लिल चाळे करणे असे प्रकार या व्हिडीओमध्ये शूट केले जात होते. या टोळी आतापर्यंत असे 300 पेक्षा अधिक व्हिडीओ ते चालवत असलेल्या 17 यू ट्यूब चॅनेल आणि फेसबुक खात्यांवर अपलोड केले. यातून त्यांनी 02 कोटी रुपये कमावले असल्याचे गुन्हेशाखेचे प्रमुख सह आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले.
टोळीचा म्होरक्या असलेला मुकेश गुप्ता हा खासगी शिकवण्या घेतो. तो 2008 साली 10 वीचा टॉपर विद्यार्थी होता. त्याचे लग्न झाले असून सोशल मिडीयावर आपल्या व्हिडीओना लाईक आणि व्युअर्स वाढवून पैसे कमावण्यासाठी त्याने हा मार्ग निवडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.