Wed, Aug 12, 2020 21:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मान्सून गोव्याच्या वेशीवर

मान्सून गोव्याच्या वेशीवर

Published On: Jun 04 2018 1:38AM | Last Updated: Jun 04 2018 1:32AMमुंबई / पुणे : प्रतिनिधी

गेले 2-3 दिवस कर्नाटकात मुक्‍काम ठोकलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) रविवारी किंचित प्रगती केली असून, तो गोव्याच्या वेशीवर पोहोचला आहे. येत्या 48 तासांत मान्सून गोव्यात दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने राज्याच्या विविध भागांत हजेरी लावली असून, येत्या 48 तासांत रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि मराठवाड्यातही वळवाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्यात 7 जूनपासून मान्सून सक्रिय होणार आहे. त्याचप्रमाणे येत्या 24 तासांत संपूर्ण ईशान्य भारत मान्सूनने व्यापला जाईल, असेही सांगण्यात आले आहे. मान्सूनची उत्तर सीमा रविवारी शिराळी, हस्सन, म्हैसूर, कोडाईकॅनाल, तुतिकोरीन अशी होती.

गेल्यावर्षी 8 जूनला मान्सून राज्यात दाखल झाला होता. मात्र, यावेळी एक दिवस आधी 7 तारखेला दाखल होणार आहे. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने उष्मा कमी केला असून, येत्या 48 तासांत राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबई, ठाणे व नवी मुंबईतदेखील ‘स्कायमेट’ने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही भागात तर मुसळधार पाऊस झाला. येत्या 48 तासांत कोल्हापूरच्या विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

संयम बाळगण्याचा सल्‍ला

राज्यात मान्सूनपूर्व पावसाने काही भागात पेरण्यांसाठी आश्‍वासक वातावरण निर्माण झाले असले, तरी राज्य सरकारने शेतकर्‍यांना संयम बाळगण्याचा सल्ला यापूर्वीच दिला आहे. मान्सून अद्याप सक्रिय झाला नसल्याने आधीच पेरण्या केल्या, तर त्या वाया जाण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने पेरण्यांना पूरक वातावरण तयार होईपर्यंत पेरण्या करू नयेत, असे राज्य सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, 6 जून ते 8 जूनदरम्यान महाराष्ट्राचा किनारपट्टी भाग, गोव्यातील पावसाचे प्रमाण वाढणार असल्याची माहिती देण्यात आली. सध्या राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत असून, गेल्या 24 तासांत महाबळेश्‍वर येथे सर्वाधिक 40 मि. मी. पावसाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. पुढील 3-4 दिवस दुपारनंतर राज्यभर मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विजांचा धोका

येत्या 24 तासांत पुणे शहर परिसरातील धायरी, खेड-शिवापूरसह जिल्ह्यातील नसरापूर, नीरा, लोणंद, फलटण येथे विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता ‘स्कायमेट’ने वर्तविली आहे. सातारा, वाई, औंध, सांगली जिल्ह्यातील बुधगाव, मौजे डिग्रज तसेच चांदोली धरण क्षेत्रातही विजांचा धोका आहे. उपग्रहातील छायाचित्रानुसार महाड, चिपळूण, रत्नागिरी, बारामती, सोलापूर व सातारा तालुक्यातील काही भाग वगळता कोकण, पुणे-मुंबईसह संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वत्र राज्याच्या आकाशावर ढगांची गर्दी आहे. 

यंदा मान्सून 27 जूनच्या आसपास राजधानी दिल्लीत धडकेल, असा अंदाज आहे. येत्या आठवडाभरात तो छत्तीसगड, मध्य प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जुलैमध्ये राजस्थान, हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचणारा मान्सून यंदा जूनअखेर तिथे धडकण्याचा अंदाज आहे.