Thu, Jul 09, 2020 06:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अयोध्येच्या तोडग्याचे श्रेय न्यायालयाचे, सरकारचे नव्हे

अयोध्येच्या तोडग्याचे श्रेय न्यायालयाचे, सरकारचे नव्हे

Last Updated: Nov 10 2019 1:37AM
मुंबई : खास प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे हिंदूंच्या भावनेला न्याय मिळाला आहे. आपण गेल्यावर्षी अयोध्येत नेलेल्या शिवनेरीवरच्या मातीचाच हा गुण असावा, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्याप्रकरणीच्या निवाड्यावर व्यक्‍त केली. येत्या 24 नोव्हेंबरला आपण अयोध्येत जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. हे श्रेय सरकारचे नाही, तर न्यायालयाचे असल्याचा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला.

राम मंदिरासाठीच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत नेते अशोक सिंघल तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा आवर्जून उल्लेख करताना अडवाणी यांच्या रथयात्रेच्या आठवणीही उद्धव यांनी जागवल्या. 

आपण लवकरच दिल्लीत जाऊन लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निकालाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानताना आपण न्यायदेवतेला साष्टांग नमस्कार करतो. या निर्णयात सरकारचे श्रेय आहे किंवा नाही, हे मी सांगू शकत नाही. परंतु, न्यायदेवतेचे श्रेय निश्‍चितच आहे. यानिमित्ताने सगळ्यांनी जो समजूतदारपणा दाखवला, तो नेहमी दाखवला तर भारत देश महाशक्‍ती होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसैनिकांनी कुठेही काही वेडेवाकडे होईल असे वागू नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

भारताच्या इतिहासातला सोनेरी अक्षराने लिहून ठेवण्यासारखा हा दिवस आहे. आज एक अध्याय जरी संपला असला, तरी एक नवीन पर्व सुरू होत आहे. या पर्वाचे आपण सगळे भारतीय म्हणून स्वागत करूया, असे आवाहनही उद्धव यांनी केले.