Sat, Dec 05, 2020 01:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लंडनहून परतलेल्या यूपीच्या डॉक्टरला ‘अल्लाउद्दीनचा दिवा’ पडला अडीच कोटींना

लंडनहून परतलेल्या यूपीच्या डॉक्टरला ‘अल्लाउद्दीनचा दिवा’ पडला अडीच कोटींना

Last Updated: Oct 30 2020 2:09AM
मुंबई : पुढारी डेस्क

आपल्या देशात दंतकथांवर विश्वास ठेवून स्वतःची फसवणूक करवून घेण्याची उदाहरणे कमी नाहीत. लंडनहून परतलेल्या एका डॉक्टरला अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा देण्याच्या भूलथापा मारून त्याला तब्बल अडीच कोटी रुपयांना फसवल्याची घटना उत्तर प्रदेशातील मीरठ येथे घडली. 

2018 मध्ये डॉ. लाईक खान आपल्या एका महिला रुग्णाला तपासण्यासाठी तिच्या घरी जात होते. एकदिवशी तिच्या घरी त्यांना इस्लामुद्दीन नावाचा तांत्रिक भेटला. आपल्याकडे जादुई ताकद असून आपण एखाद्याला अब्जोपती बनवू शकतो, अशा थापा त्याने डॉ. खान यांना मारल्या. तसेच आपल्याकडे अल्लाउद्दीनचा दिवा आहे. त्यातून ‘जीन’देखील बाहेर येतो, असे ठासून सांगितले. त्याच्या बोलण्याला भुलून डॉ. खान यांनी त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. दरम्यान या तांत्रिकाने आपल्या एका मित्रालाही सोबत घेतले. सुरूवातीला या दोघांनी डॉ. खान यांच्याकडून 12 हजार रुपये घेतले. त्यांनी या दिव्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. 

या दिव्यातून खरोखरच धूर येताना दिसला. त्यामुळे डॉ. खान यांचा विश्वास आणखी वाढला. मात्र या दिव्याला हात लावू नका, आम्ही ज्यावेळी सांगू त्याचवेळी हा दिवा घरी घेऊन जा, असे या दोन भामट्यांनी डॉ. खान यांना बजावले. दोन वर्षांच्या काळात या दोघांनी त्यांच्याकडून तब्बल अडीच कोटी रुपये उकळले. शेवटी आपली फसगत झाल्याचे डॉ. खान यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर इस्लामुद्दीन आणि त्याचा मित्र अनिस या दोघांना अटक करण्यात आली. आपण   सुगंधी द्रव्य वापरून धूर निर्माण करत होतो. त्यातून जीन बाहेर निघाल्याचा भास होत होता, अशी कबुली या दोघांनी दिली.