Thu, Nov 26, 2020 20:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तोतापुरीसारखा दिसणारा स्पेनचा आंबा वाशीत दाखल

तोतापुरीसारखा दिसणारा स्पेनचा आंबा वाशीत दाखल

Last Updated: Oct 30 2020 2:09AM
नवी मुंबई : पुढारी वार्ताहर

आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अवकाश असला तरी आता वाशीतील एपीएमसीच्या घाऊक फळ बाजारात स्पेनचा आंबा दाखल झाला आहे. दसर्‍याच्या मुहूर्तावर बाजारात हा परदेशी आंबा आल्याने बाजारात या आंब्याचा बोलबाला सुरू आहे. 

मुंबई घाऊक बाजारात देशाच्या कानाकोपर्‍यातून आणि परदेशातील ठराविक ठिकाणाहून आंब्याची आवक होत असते. आंब्यासाठी वाशीतील एपीएमसी मार्केट ही देशातील  सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सर्व ठिकाणी जवळपास आजूबाजूच्या सर्व राज्यातून आंबा दाखल होत असतो.

घाऊक फळ बाजारात वर्षभर विविध प्रकारच्या आंब्यांची, कैर्‍यांची आवक होत असते. मात्र, ती कमी जास्त प्रमाणात असते. आता आंब्याचा हंगाम नाही. मात्र परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या हवामानानुसार फळे येतात व त्यानुसार ती आपल्या बाजारातही पाहायला मिळतात. आता स्पेनमधून आंब्यांची आवक झाली आहे. त्याचे 50 बॉक्स बाजारात आले असून एका बॉक्स मध्ये 50 आंबे आहेत. त्या एका बॉक्सची किंमत 3600 ते 4000 इतकी आहे. तोतापुरी आंब्याला आपल्याकडे 40 ते 60 रुपये किलोचा दर असतो. त्यामुळे स्पेनच्या आंब्यासाठी कुणी अधिक पैसे मोजायला तयार नाहीत. कमी दरात तोतापुरी आंबा मिळत असल्याने स्पेनच्या आंब्याला बाजारात हवा तसा उठाव मिळालेला नाही. त्यामुळे हा आंबा बाजारात शिल्लक राहिला आहे.

स्पेनचा आंबा आपल्या कडील तोतापुरी आंब्यासारखा हुबेहुब दिसत आहे. मात्र दर फारच असल्याने या आंब्याला बाजारात हवा तसा उठाव मिळाला नाही, असे फ ळ व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले.